अहमदनगर/प्रतिनिधी : गैरव्यवहाराचा एक खड्डा केल्यानंतर त्यात पडण्याच्या भीतीने तो बुजवण्यासाठी गैरव्यवहाराचा दुसरा खड्डा करून पहिल्या खड्ड्यात माती लो
अहमदनगर/प्रतिनिधी : गैरव्यवहाराचा एक खड्डा केल्यानंतर त्यात पडण्याच्या भीतीने तो बुजवण्यासाठी गैरव्यवहाराचा दुसरा खड्डा करून पहिल्या खड्ड्यात माती लोटण्याचा प्रकार येथील नगर अर्बन बँकेच्या कारभारातून स्पष्ट होऊ लागला आहे. एक कर्ज मिटवण्यासाठी दुसरे कर्ज घेऊन पहिले मिटवण्याचे गैरप्रकार या बँकेच्या कामकाजात स्पष्ट होत आहेत. दीडशे कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या श्रीगोंद्याच्या सचिन गायकवाडकडे पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. त्यामुळेच नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात हा तपास महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी 28 कर्ज प्रकरणांतून नगर अर्बन बँकेची सुमारे दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे सुरू असून, या पोलिसांनी नुकतीच सचिन गायकवाड याला या प्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली असल्याने पोलिसांकडून त्याच्याकडे या गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. यातून अनेक गंभीर बाबी स्पष्ट होत आहेत. नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणात पकडलेला आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदा) याच्याकडे सुरू असलेल्या तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या आहेत. संचालकांशी संबंधित जवळच्या व्यक्तींची कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा स्वतःचे थकबाकीतील कर्ज खाते एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित थकीत कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत. पोलिसांनी आरोपी सचिन गायकवाड याच्याशी संबंधित घृष्णेश्वर मिल्क व जिजाऊ मिल्क प्रॉडक्शन या कंपन्यांच्या कर्जखात्याची व बँक खात्याची तपासणी सुरू केली आहे. कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग इतर कारणासाठी झाल्याचे यात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. काही रकमा इतर कर्ज खात्यांमध्ये वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्ज खातेदार, संचालकांच्या जवळचे काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट संदर्भातही पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातही काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे बँकेतील व्यवहारांमधून समोर येत असल्याने या रकमा कुणाकडे वळविल्या गेल्या, या सर्व प्रकारांमध्ये कोणाची साथ होती, यात संचालक व अधिकार्यांचा समावेश आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 20 जूनपर्यंत आरोपी गायकवाडला पोलिस कोठडी असल्यामुळे तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता आहे. तपासात आरोपी गायकवाडकडून मिळालेल्या माहितीनुसार व बँकेच्या अहवालामधील व्यवहारांच्या नोंदीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला आहे.
बँकेचा लेखाजोखा लागला हाती
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने काही कागदपत्रांची मागणी नगर अर्बन बँकेच्या प्रशासनाकडे केली होती. पण ती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यावर आता थेट आरबीआयकडून बँकेशी संबंधित सर्व अहवाल प्राप्त करून घेतल्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराचा संपूर्ण लेखाजोगा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन व सध्याच्या संचालकांचे धाबे दणाणले आहे. यात गायकवाडच्या सुरू असलेल्या चौकशीत तो मदत करणार्यांमध्ये कोणाची नावे घेतो व त्यावर पोलिसांची काय कारवाई होते, याची उत्सुकता नगरमध्ये व्यक्त होत आहे.
COMMENTS