दावोस च्या आर्थिक परिषदेला ऑनलाईन संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अडखळले याचे मुख्य कारण टेलिप्राॅम्टरची खराबी असल्याचे बाहेर आले. यातून मोदी ह
दावोस च्या आर्थिक परिषदेला ऑनलाईन संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अडखळले याचे मुख्य कारण टेलिप्राॅम्टरची खराबी असल्याचे बाहेर आले. यातून मोदी हे वाचून बोलतात यावर आता शिक्कामोर्तब झाले, असे म्हणता येईल. परंतु, ज्या परिषदेला मोदी संबोधित करीत होते त्या दावोस परिषदेच्या एक दिवस आधीच ऑक्सफार्म या संस्थेने एक जागतिक अहवाल प्रसिद्ध केला त्यानुसार कोरोना महामारीच्या काळात भारतात आरोग्य सुविधा प्रचंड महागडी झाल्याने ती जणूकाही चैनीची बाब बनली आहे, असे नमूद करित सर्वसामान्य भारतीयांचा मात्र दर चौथ्या सेकंदाला एक मृत्यू केवळ उपचारांच्या अभावाने होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा या एकतर कमकुवत केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना योग्य उपचार मिळण्यात मोठा अभाव निर्माण झाला आहे. मात्र, त्याचवेळी श्रीमंत पैसे मोजून सुविधा मिळवित असले तरी प्रचंड पैसा त्यात खर्च केला जातो आहे. तशातच वर्तमान केंद्र सरकारच्या हातात देशाची सारी आर्थिक सुत्रे एकवटल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यांकडे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने ते सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर निधी अभावी पुरेसा खर्च करू शकत नाही. आरोग्यावर हा अहवाल शेवटी बोलतो पण, या अहवालाची मुख्य स्फोटक बाब आहे की, सन २०२१ या एका वर्षात भारतीय अब्जाधीशांची संख्या चाळीस ने वाढली. सन २००० मध्ये भारतीय अब्जाधीशांची संख्या फक्त ९ होती. सन २०१७ मध्ये ती १०१ एवढी झाली. सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत ती संख्या १४२ एवढी झाली आहे. देशातील या १४२ अब्जाधीशांकडे देशातील एकूण ७६ टक्के संपत्ती एकवटली असून या अब्जाधीशांची एकूण संपत्ती ७७५ अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. या अब्जाधीशांची संपत्ती भारताच्या एकूण वार्षिक बजेटच्या अडीचपट झाली आहे. ५७.७ लाख कोटी ची ही संपत्ती भारताच्या सन २०२०-२१ च्या वार्षिक बजेटच्या अडीचपट झाली आहे. यातही केवळ दोन अब्जाधीशांच्या संपत्तीत तर आश्चर्यकारक वाटावी एवढी वाढ झाली आहे. गेल्या एक वर्षात गौतम अडाणी या उद्योजकाची संपत्ती ८.९ अब्ज वरून ५०.५ अब्ज एवढी वाढली. म्हणजे केवळ एका वर्षात साडेआठशे पटीने ती वाढली. अडाणीच्या संपत्तीत एकशे बेचाळीस अब्जाधीशांच्या संपत्तीच्या एकूण वीस टक्के संपत्ती वाढली तर मुकेश अंबानी च्या संपत्तीत थेट दोनशे पटींनी वाढ झाली. भारतातील अब्जाधीशांची या एका वर्षात वाढलेल्या संख्येने भारत अब्जाधीशांच्या यादीत जगात अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, अमेरिका आणि चीन यांच्या देशासारखा भारतीय अब्जाधीशांचा अभिमान बाळगता येणार नाही. कारण या काळात देशात कधी नव्हे एवढी बेरोजगारी आणि दारिद्रय वाढले. भारतातील ६३ टक्के लोक थेट गरिबीच्या खाईत लोटले गेले आहेत. अब्जाधीशांची संख्या आश्चर्यकारक वाढणे आणि गरिबांच्या संख्येत अतोनात वाढ होणे या दोन्ही बाबी मोदी सरकारच्या लाजिरवाण्या आणि जनविरोधी आर्थिक धोरणांचा परिणाम आहे. भारतीय महिलांची वित्तीय स्थिती जवळपास १३५ वर्षे मागे लोटली गेल्याचा ठपका देखील या अहवालात ठेवण्यात आला आहे. एकंदरीत ऑक्सफार्म संस्थेने जो जागतिक अहवाल सादर केला ते पाहता कोणत्या कारणास्तव मोदी विदेशी गुंतवणूकदारांना दावोस परिषदेच्या निमित्ताने निमंत्रित करित आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ करित श्रीमंत अधिक श्रीमंत करणारे आणि मध्यमवर्गीय पासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांना गरिबी आणि बेरोजगारी कडे ढकलणारे मोदी सरकारच्या धोरणांमुळे आज महामारीच्या काळात दिवसाला एकवीस हजार आणि दर चार सेकंदाला एक मृत्यू आरोग्य सुविधा किंवा उपचारांच्या अभावाने देशात होत आहेत. ही लाजिरवाणी तितकीच संतापजनक आहे, यात शंकाच उरली नाही!
COMMENTS