Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीपूर्वी मिळणार पीक विम्याची देय

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्‍वासन

नागपूर/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर सप्टेंबरच्या मध्यावधीपासून पावसाला सुरूवात झाली. या पाऊसात 23 सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जि

भुजबळानंतर आता धनंजय मुंडेना धमकी
 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी केले अभिवादन

नागपूर/प्रतिनिधी : राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर सप्टेंबरच्या मध्यावधीपासून पावसाला सुरूवात झाली. या पाऊसात 23 सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून, याचा आढावा सोमवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून, राज्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात पीक विमाचा 25 टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री मुंडे यांनी केले.
नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव असून त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी व बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री मुंडे यांनी स्वतः शेताच्या बांधावर जात पाहणी केली. त्यांनी अडयाळी, उमरगाव, पाचगाव, विरखंडी या गावांना प्रामुख्याने भेटी दिल्या. तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी त्यांना शेतकरी बांधवांनी विविध मागणीची निवेदने सादर केली. अनेक ठिकाणी त्यांनी ताफा थांबवून पाहणी केली. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकर्‍यांनी त्यांनी सोयाबीनवर आलेल्या ’पिवळ्या मोजाक व्हायरस’ या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.सोयाबीनचे दाणे भरलेच नसल्याचे शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष त्यांना दाखविले. तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने अक्षरशः उभ्या पीकावर रोटावेटर फिरवल्याची आपबीती शेतकर्‍यांनी सांगितली. यावेळी कृषी मंत्र्यानी बांधावरच शेतकर्‍यांना आश्‍वस्त केले. ते म्हणाले, यावर्षी राज्यात 1 कोटी 70 लाख शेतकर्‍यांनी विक्रमी पीक विमा काढला असून आंतरपिकाच्या सुद्धा विमा काढण्यात आलेला आहे. त्या शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळणार आहे. यावर्षी मदत देताना राज्य शासन जून महिन्यात झालेल्या पिकाचे नुकसान, 21 दिवस जिथे पावसाचा खंड पडला आहे. त्या ठिकाणाचे नुकसान, तसेच नागपूर व विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या तीन घटकांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असून त्यांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याबद्दल मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री अतिशय गंभीर असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतल्या जाईल,असे शेतकर्‍यांशी संवाद साधताना सांगितले. कुही तालुक्यातील विरखंडी या गावातील शेतकरी दिनेश पडोळे यांच्या शेतामध्ये त्यांनी बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे पर्‍हाटीवर झालेल्या दुष्परिणामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

25 टक्के रक्कम मिळणार दिवाळीपूर्वी- महाराष्ट्र शासनाने एक रुपया शेतकर्‍याला भरायला सांगितला होता. उर्वरित विम्याचा प्रीमियम शासनाने भरला आहे. देशात हे पाहिले उदाहरण आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची 25 टक्के रक्कम दिवाळीपूर्वी खात्यामध्ये मिळणार आहे. याशिवाय 65 मिलीमीटर पेक्षा सतत चार तास पाऊस ज्या ठिकाणी झाला आहे, अशा अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले, असेल तिथे राज्य आपदा मदत निधी ( एसडीआरएफ ) व केंद्रीय आपदा मदत निधीच्या ( एनडीआरएफ ) नियमानुसार शेतकर्‍यांना मदत करता येते. ही मदत देखील आम्ही लवकरच देणार आहे. आज मंगळवारी राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय मांडणार असून यावर तात्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी दिली आहे.

COMMENTS