सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील खावली येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील सुमारे 20 ते 25 विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात कोरोना बाधित
सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील खावली येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील सुमारे 20 ते 25 विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु करण्यात आले आहेत. मुलांच्या संपर्कात आलेले सुमारे दहा शिक्षक कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाधित नसलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी घरी घेऊन जाण्याचा पर्याय सुचविला आहे. या विद्यार्थ्यांवर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेऊन उपचार केले जात आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेदरम्यान, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना बाधीत रुग्णांच्या विलगीकरणासाठी सातारा तालुक्यातील खावली येथील जवाहर नवोदय विद्यालयाची इमारत ताब्यात घेतली होती. त्या कालावधीत देशभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात शाळा सुरु झाल्या व कोरोनाचा आकडा वाढू लागल्याने राज्य शासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती. पण जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी असल्याने तेथील विद्यार्थी शाळेतच निवासी शिक्षण घेत आहेत. मागील आठवड्यात काही विद्यार्थ्यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काही विद्यार्थी कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर सर्व बाधित विद्यार्थ्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या नियमित संपर्कात असलेले 10 शिक्षकही कोरोना बाधित सापडले. त्यामुळे शिक्षकांनाही विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नवोदय विद्यालयातील काही मुले बाधित आढळली होती. त्यानंतर त्यांना तातडीने गृहविलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जे विद्यार्थी कोरोना बाधित नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने येथील नववी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निवासी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मुले एकत्र राहात असल्याने बाधितांचा आकडा जास्त वाटत आहे. पण तशी गंभीर परिस्थिती नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
COMMENTS