राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपासून कोरोना वाढत असल्याचे सांगत निर्बंध लावण्यासंदर्भात सातत्याने वक्तव्य करित आहेत. राज्याचे संसर्गजन्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपासून कोरोना वाढत असल्याचे सांगत निर्बंध लावण्यासंदर्भात सातत्याने वक्तव्य करित आहेत. राज्याचे संसर्गजन्य प्रमुख गोपाळ आवटी यांनी आपले स्पष्ट निवेदन केले, ज्यात ते म्हणतात की, कोरोना वाढत असला तरी चिंतेचे कारण नाही. ओमायक्रान च्या उप विषाणू सध्या दिसून येत असले तरी यामुळे लाट येण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण कोणताही व्हेरियंट पूर्णपणे नव्याने येतो तेव्हाच लाट येण्याचा धोका असतो, असेही आवटी यांनी म्हटले होते. सध्याचे उप व्हेरियंट सौम्य लक्षणें असणारा व हाॅस्पिटलाईज न होऊ देणारा आहे, असे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या कोरोना वाढत असल्याची चिंता करण्याची नेमकी काही कारणे आहेत का? हे देखील तपासायला हवे. आपण सर्वजण जाणतातच की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार तर यामागे नाही ना? खरेतर, कोरोना च्या भितीचा राजकीय वापर देशात राज्यकर्ते मोठ्या प्रमाणात करित आहेत. कोरोनाची भिती दाखवत लोकांना घरात बसवून निवडणूका जिंकण्यासाठी सोप्या करून घेण्याचे डावपेच कोरोनाची भीती घालून करण्याची हातोटी राज्यकर्त्यांमध्ये वाढीस लागली आहे. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुक काळात केंद्र सरकारकडून अशीच भीती मोठ्या प्रमाणात दाखवली गेली होती. काहीसा तोच प्रकार सध्या राज्य सरकारमधील मंत्र्यांनी सुरू केल्याचे यावरून दिसते आहे. कोरोना हा एक विषाणूजन्य आजार म्हणून आणि त्याची भयावहता वैज्ञानिक विचार करता नाकारता येत नाही. या आजाराची भीषणता मान्य करूनही लोक त्यातून आता बाहेर येत आहेत. अशावेळी लोकांना पुन्हा थेट भितीत नेणं हे योग्य नाही. सध्या राज्यातील अनेक महानगर पालिकांच्या निवडणूकांचा कार्यक्रम सुरू होतो आहे. सध्या आरक्षण सोडतींचा कार्यक्रम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री कोरोना-कोरोना करित आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण कोरोना काळ ज्या पद्धतीने हाताळला ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. आरोग्यमंत्री देखील सध्या कोरोनाची भीती घेण्याची गरज नसल्याचे सांगत काळजी घ्यावी एवढे आवाहन करित असतात. एकंदरीत कोरोनाची दहशत जगभरात कमी होत आहे, नव्हे, झाली आहे. कालच ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉ. संग्राम पाटील यांनी इंग्लंडच्या सर्वच शासकीय रुग्णालयात आता मास्कची सक्ती हटविण्यात आल्याचे सांगितले. याचाच अर्थ जगभरात कोरोना संपला नसला तरी आता धोक्याच्या बाहेर गेला आहे. तरीही, महाराष्ट्रात कोरोना – कोरोना जे केले जात आहे ते निर्विवादपणे महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन लढविली जात असलेली शक्कल आहे. लोकांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणारा कोरोनाचा काळ फारच भीषण होता. लोकांना आताशी रोजीरोटीला लागता आले आहे. अजून पुरते सावरले नाहीत. अशात पुन्हा कोरोनाची हकाटी देणं सर्वथा चूक आहे. निवडणूक व्यवस्थापनाचा भाग कोरोनाला बनवू नये. लोकांची मानसिकता आणि प्रतिकारशक्ती दोन्हींमध्ये आता वाढ झाली आहे. कोरोनापासून सावधानतेचे भान असायला हवे. परंतु, अशा प्रकारची भीती निर्माण करून लोकांना भयभीत करित निवडणूक व्यवस्थापन करणे सर्वथा चूक आणि लोकांच्या मनाविरुद्ध होईल. लोकांनी काळजी घ्यावी, असा प्रयत्न जरूर करावा, मात्र, लोकांना भयभीत करून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या सक्तीला विरोधाची मानसिकता होईल, इतक्या अवस्थेपर्यंत जाऊ नये, हीच लोकांची अपेक्षा आहे.
COMMENTS