नांदेड जिल्ह्यात कडक अंमलबजावणी कॉपीमुक्त वातावरणात 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा नांदेड जिल्ह्यात घेण्याचा जिल्हाधिकार्यांचा निर्धार नांदेड । प्रतिनि
नांदेड जिल्ह्यात कडक अंमलबजावणी
कॉपीमुक्त वातावरणात 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा नांदेड जिल्ह्यात घेण्याचा जिल्हाधिकार्यांचा निर्धार
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात दहावी व बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि यंत्रणेला कडक शब्दांत इशारा देत यंदा परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड न करता शिस्तबद्ध, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी काही परीक्षा केंद्रांवर बाहेरील जमाव, गोंधळ आणि गैरप्रकारांचे प्रकार समोर आले होते. यंदा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित कर्मचार्यांवर त्याच दिवशी थेट कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या नियोजनासाठी आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. परीक्षेला जत्रेचे स्वरूप येणे ही केवळ शैक्षणिक व्यवस्थेचीच नव्हे तर समाजाच्या नैतिक अधःपतनाची चिन्हे असल्याचे सूचक आहे, अशी सूचक टिप्पणी करत जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाला सतर्कतेची जाणीव करून दिली. केंद्र संचालक किंवा पर्यवेक्षकांच्या हलगर्जीपणामुळे जर कुठेही कॉपी, बाहेरील हस्तक्षेप किंवा शिस्तभंग आढळून आला, तर जबाबदारी थेट संबंधितांवर निश्चित केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, त्याचबरोबर सर्व तहसीलदारांनी 4 फेब्रुवारी रोजी विशेष बैठक घेऊन केंद्रप्रमुखांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात अनावश्यक गर्दी, हुल्लडबाजी किंवा पालक-नातेवाइकांची वर्दळ यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्राबाहेर गर्दी करणार्यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही केली जाईल. भौतिक सुविधांबाबत जिल्हाधिकार्यांनी एक गंभीर त्रुटी अधोरेखित केली. काही केंद्रांवर विद्यार्थी बेंचवर बसून मांडीवर पॅड ठेवून परीक्षा देतात, ही बाब अत्यंत चुकीची असून अशा केंद्रांनी तातडीने शंभर टक्के ड्युअल डेस्कची व्यवस्था करावी, असे त्यांनी बजावले. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचा शारीरिक त्रास कमी होणार नाही, तर कॉपीसाठी निर्माण होणार्या संधींनाही आळा बसेल. तसेच ज्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत, तेथील केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलून नवीन नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर तैनात असलेल्या बैठे पथकाने केवळ नावापुरते न थांबता पूर्ण वेळ उपस्थित राहून सतत निरीक्षण करावे, असेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी जिल्ह्यातील संपूर्ण नियोजनाचा सविस्तर आराखडा सादर केला. शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप कुमार बनसोडे यांनी झूम वेबकास्टिंगद्वारे परीक्षा प्रक्रियेवर तांत्रिक पद्धतीने लक्ष ठेवण्याची माहिती दिली. डायटचे प्राचार्य अमोल निळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटशिक्षणाधिकारी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते. कॉपी ही केवळ नियमभंगाची कृती नसून ती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारी फसवणूक आहे. कॉपीमुळे मिळालेले गुण तात्पुरते समाधान देतात; मात्र दीर्घकालीन आयुष्यात कौशल्य, आत्मविश्वास आणि नैतिकता यांच्या अभावामुळे विद्यार्थी पिछाडीवर पडतात. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान हे शिक्षणव्यवस्थेतील सुधारणेचे मूलभूत पाऊल मानावे लागेल. नांदेड जिल्हा प्रशासनाने यंदा घेतलेली कडक भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र यश केवळ आदेशांवर अवलंबून नसून अंमलबजावणीवर अवलंबून आहे. केंद्रप्रमुखांची जबाबदारी, बैठे पथकांची सक्रियता, पोलीस यंत्रणेचा तत्पर प्रतिसाद आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर – या चार स्तंभांवर हे अभियान उभे राहील. यासोबतच पालकांची मानसिकता बदलणेही तितकेच गरजेचे आहे. मुलगा पास झाला म्हणजे झाले या दृष्टिकोनातून बाहेर येऊन मुलगा प्रामाणिकपणे शिकला पाहिजे हा विचार रुजवावा लागेल. शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संस्कार रुजवण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलेले कळकळीचे आवाहन महत्त्वाचे आहे – परीक्षा केवळ कॉपीमुक्तच नव्हे, तर भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे. भीतीमुळे नव्हे तर मूल्यांची जाणीव म्हणून विद्यार्थी प्रामाणिक राहिले, तरच या अभियानाचे खरे यश म्हणावे लागेल. नांदेड जिल्ह्यातील हा उपक्रम यशस्वी ठरला, तर तो इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरू शकतो. शिक्षणातील प्रामाणिकपणाची ही चळवळ समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली, तरच उद्याची पिढी सक्षम, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित घडेल.

COMMENTS