छत्रपती संभाजीनगर : ग्रामिण भागातील नागरिकांनाआपल्या तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ‘जिल्हाधिकार

छत्रपती संभाजीनगर : ग्रामिण भागातील नागरिकांनाआपल्या तक्रारी, गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची आज सुरुवात झाली. आज या उपक्रमाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ४० हून अधिक नागरिकांचे म्हणणे ऐकले. त्यातील ७ जणांच्या तक्रारींवर जागीच निकाल देण्यात आला.
‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’या उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड सहभागी झाले. तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच तहसिल कार्यालयात आलेले अभ्यागत, तक्रारदार दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधण्याचाही अनुभव या उपक्रमाच्या माध्यमातून घेतला.आजच्या दिवशी या उपक्रमात आज एकूण ४० तक्रारी पैकी सात तक्रारींचा जागेवरच निकाल देण्यात आला. ग्रामीण भागात स्मशानभूमीची जागा, जमीन मोजणी, अतिक्रमण, सातबारा नोंद, अतिवृष्टीचे अनुदान अप्राप्त, संत सेवालाल बंजारा तांडा सुधार योजना, कुळ कायद्यातील जमीन विक्री बाबतची परवानगी, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वेळेत अनुदान मिळण्याची मागणी,वारसा हक्क प्रमाणपत्र, शिवरस्ता तयार करून मिळणे बाबत या संदर्भातील तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मांडल्या. या तक्रारींचे निराकरण करण्याबाबत संबंधित तहसिलदार व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
आजच्या या उपक्रमात सोयगाव तालुक्यातील संदीप इंगळे,सिल्लोड येथील श्री.भोसले, फुलंब्री तालुक्यातील प्रभाकर राठोड, काशिनाथ गुंजाळ, वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथील बबनबाई सोरसे,गणेश हिवाळे, छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील रमेश पवार, पैठण तालुक्यातील गाडेकर अशा ४० तक्रारदारांनी आपले म्हणणे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यासमोर मांडले व तक्रारींच्या निराकरणाचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधितांना दिले.
दर सोमवार आणि गुरुवार या दोन दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबविला असून याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे. यामध्ये होणाऱ्या तक्रारीची नोंद प्रत्येक तहसील मध्ये करण्यात येणार असून यांचा आढावा वेळोवेळी घेण्यात येणार आहे. रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीची तपासणी संबंधित भेटीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही बाबत आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असून ती वेळेत करावी व आपल्या अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले.
COMMENTS