सातारा/प्रतिनिधी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने 24 ऑगस्ट रोजी या बहिणाब
सातारा/प्रतिनिधी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने 24 ऑगस्ट रोजी या बहिणाबाई चौधरी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी केली. बहिणाबाई यांची गाण्याचे गेय सादरीकरण, गीतांचे वाचन मराठी विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केले. या जयंती कार्यक्रमासाठी काव्यवाचन कार्यक्रमास अमृतवाडी येथील ज्येष्ठ कवी शशिकांत पार्टे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शशिकांत पार्टे यांनी बहिणाबाई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या वृद्धामृत कविता संग्रहातील विविध कवितांचे वाचन करून विद्यार्थ्यांना शब्दांची सृष्टी कवी कसा तयार करतो हे स्वानुभवातून सांगितले. कवी शशिकांत पार्टे म्हणाले की ‘बरचसं वाचलं म्हणूनच सुचलं,अन सुचलं म्हणूनच रचलं’ खेड्यातले जीवन मी पाहिले, दगड विटा माती चुली धूर स्वयंपाक, गाय म्हशी दूध ताक, या शेती या जगण्यातून माझी कविता तयार झाली. जवानीच्या काळात धबाधबीच्या ओढ्यात मासे खेकडे पकडत जे जीवन गेले, दुष्काळ, गरिबी त्याच्या आठवणी माझ्या कवितेत आल्या. ग्रामीण जीवनातला रस माझ्या कवितेतून वाहतो आहे असे ते म्हणाले. बहिणाबाई चौधरी यांना निसर्गाने, धरित्रीने चांगले मन दिले त्यामुळे त्यांची कविता सात्विक विचाराची झाली असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक करताना मराठी विभागातील डॉ. कांचन नलवडे यांनी बहिणाबाई चौधरी यांची चरित्रात्मक माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांचे जीवन आणि त्यांच्या कवितेची निर्मिती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. राही सोनावले, रोहन बोभाटे, रचना बोराटे, शुभांगी पवार, सिद्धिका भोसले, पलक जाधव, पूजा बरकडे, इत्यादी विद्यार्थ्यांनी बहिणाबाई यांची गाणी सादर केली. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी आपले मी भारतीय व संविधानाच्या स्वप्नातलं गाव हे आपले कविता कवितासंग्रह सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना भेट दिले. बहिणाबाई यांची गाणी गाऊन दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजयकुमार सरगडे यांनी केले, आभार प्रा. श्रीकांत भोकरे यांनी मानले.
बहिणाबाईंची गाणी म्हणजे निर्मळ झरा ः डॉ. सुभाष वाघमारे – मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले की, ‘बहिणाबाई या विचारी कवयित्री आहेत. त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत सांगितले. जीवनात सुख, दुःख येतच असते तरी देखील संसार हा आपल्या गळ्यातील हार आहे असे त्या सांगतात. माणुसकी त्यांच्या प्रत्येक कवितेत आहे. त्या ईश्वर मानत असल्यातरी दैववाद, भविष्य हे त्यांना मान्य नाही .निसर्गातूनच चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते असे त्यांचे मत होते. माणसाची नियत बेकार आहे, गोठ्यातले जनावर इमानदार आहे. स्वार्थापुरते लोक गोड बोलतात. वास्तविक नितीमत्ता चांगली हवी, व्यसन नको, कामातून देव प्राप्त होतो, म्हणून कष्ट करावे, आळसी राहू नये, जन्माला आलो म्हणून आपण निर्मात्याविषयी कृतद्न्य राहिले पाहिजे ही भावना बहिणाबाई व्यक्त करतात. बहिणाबाई यांची गाणी म्हणजे निर्मळ असा झरा आहे. त्यांची कविता मनापासून जो समजून घेईल तो एक चांगला माणूस होईल असे ते म्हणाले, असेही यावेळी अध्यक्षीय भाषणात वाघमारे म्हणाले.
COMMENTS