Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसब्यात परिवर्तन, चिंचवडमध्ये भाजपने गड राखला  

महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपच्या अश्‍विनी जगताप विजयी

पुणे/प्रतिनिधी ः कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून, गेल्या तीन दशकांपासून भाजपचे वर्चस्व असलेला कसबा मतदारसंघ भाजपने गमा

लोकल च्या मोटर कोचच्या डब्याला लटकला होता तरुण,अचानक हात सटकला अन्…|
गावगुंडांची दहशद ; हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण I LOKNews24
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही नविन ग्रामपंचायत स्थापना

पुणे/प्रतिनिधी ः कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून, गेल्या तीन दशकांपासून भाजपचे वर्चस्व असलेला कसबा मतदारसंघ भाजपने गमावला असून, येथुन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. तर दुसरीकडे चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आश्‍विनी जगताप विजयी झाल्या आहेत. विशेष राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे जगताप यांचा विजय झाला आहे, अन्यथा येथेही निकालाचे चित्र वेगळे असते.
तब्बल तीन दशके भाजपचा पारंपारीक मतदारसंघ असलेला कसबा पेठ काँग्रेसने आपल्याकडे हिसकावून घेतला आहे. कारण अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला त्यात काँग्रेसच्या (मविआ) रवींद्र धंगेकर यांनी 11,040 मतांनी प्रतिस्पर्धी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबात एकूण दोन लाख 75 हजार 679 एकूण मतदान असून त्यापैकी एक लाख 38 हजार 403 मतदारांनी नोंदवलेली मते मतदान प्रक्रियेत पात्र ठरलेली होती. या निवडणुकीत धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 मते पडली तर भाजपच्या हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते प्राप्त झाली. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी 296 मते मिळवत ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना 47 मते प्राप्त झाले. दवे आणि बिचकुले या दोघांचे निवडणुक डिपॉझीट जप्त झाले आहे.

दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. ’काटे की टक्कर’ अशी ही लढत पाहिला मिळाली होती. मात्र भाजपच्या अश्‍विनी जगताप यांनी 36 हजार 168 मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्‍विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली. चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसब्यातील विजयाची आणि चिंचवडमधील पराभवाची कारणे सांगितली. कसब्यात आणि चिंचवडमध्ये मी प्रचार करत होतो. चिंचवडमध्ये प्रचार करत असताना मला काही माहिती येत होती. राहुल कलाटे यांना सत्ताधारी कशी मदत करत होते, याची मला माहिती येत होती.सत्ताधार्‍यांनी कलाटे यांना मदत केल्यामुळेच आमचा पराभव झाला. मी कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं अनेकवेळा आवाहन केलं होतं. आता नानाला संधी देऊ असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही, असं अजित पवार म्हणाले. याबद्दल पुढे बोलताना त्यांनी कलाटे आणि नाना काटे यांची मते पाहिली तर ती मते भाजपच्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहे. बंडखोरी झाली नसती तर चित्र वेगळे दिसले असते. मागच्यावेळी कलाटेंना लाखभर मते मिळाली. पण यावेळी त्यांना ती मते मिळाली नाहीत. पण त्यांनी स्वत:ची मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असेही अजित पवार म्हणाले.

आमच्यामुळेच भाजपचा पराभव ः आनंद दवे – कसबा विधानसभा मतदारसंघात टिळक कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे निषेधार्थ ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दवे यांनी सांगितले की, कसबा विधानसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपचा पराभव झाला याची खंत आम्हाला आहे; परंतु त्याचा पश्‍चाताप आम्हाला नसल्याचे दवे यांनी म्हटले आहे.

COMMENTS