विवेकाची कास

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विवेकाची कास

संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी. संत जनाबाई यांनी अभंगातून सामाजिक प्रबोधन केल्याचा इतिहास आहे. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारात तसे साम्य

द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ
गोवरचा विळखा
न्यायालयीन सक्रियता

संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी. संत जनाबाई यांनी अभंगातून सामाजिक प्रबोधन केल्याचा इतिहास आहे. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारात तसे साम्य आहे. या संतांच्या अभंगात, ओव्यात तथाकथित लोकांनी भेसळ केली हे खरेच. वारकरी संप्रदायातील पंढरपूरच्या विठ्ठलाप्रती या संतांची भक्तिभावे श्रद्धा होती आणि त्यातूनच त्यांनी अभंगाची निर्मिती करत समाजप्रबोधन केले. पण पंढरपूरचा विठ्ठल कोण होता? यावर या संतांनी अभंगातून प्रकाश टाकला आहे. या संतांनी नेमके काय प्रबोधन केले आणि त्याचे संदर्भ काय यावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त.
पांडुरंगाची मूर्ती ही बुद्ध मुर्ती आहे का? आणि पांडूरंगाचा इतिहास काय? रामाचा इतिहास रामायणात, कृष्णाचा इतिहास भागवत पुराणात किंवा महाभारतात आढळतो, तसा विठ्ठलाचा इतिहास धर्मग्रंथात आढळत नाही. किंबहुना: ते स्पष्ट होत नाही. हजारो वर्षापासूनची पंढरपूरची आषाढी वारी वारकरी सांप्रदाय करतात, हा इतिहास आहे. पण वारकरी सांप्रदायातील संतांनी आपल्या अभंगातून, ओव्यातून पांडूरंगाचा उल्लेख बुद्ध म्हणून केला आहे. वारकरी सांप्रदायातील संत जनाबाई म्हणतात. ‘होऊनिया कृष्ण, कंस वधियेला | आता बुद्ध झाला, सखा माझा | (344) या ओवीतील प्रमाण हे सिद्ध करते की, पांडुरंग हा कृष्ण अवतार सांगितला जात असला तरी, तो खरा बुद्ध आहे. संत जनाबाईच्या अनेक ओव्यातून त्यांनी हे प्रमाण दिले आहे. संत बहिनाबाई म्हणतात, कलयुगी बौद्ध, रूप धरी हरी। तुकोबा शरीर प्रकटला॥ संत नामदेवांच्या संतवचनातून ते म्हणतात की, मध्ये झाले  मौन, देव निजे ध्यानी। बौद्ध ते म्हणोनी नावरूप॥ (2105) संत तुकारामही आपल्या अभंगातून हे दाखले देतात. बौद्ध अवतार माझीया आत्ताष्ठ। मौन्य मुखे निष्ठा धरियेली॥ संत एकनाथ महाराजही पंढरपूरचा पांडुरंग बुद्ध असल्याचे अभंगातून सांगतात. ते म्हणतात की, नववा बैसे स्थिररूप। तया नाम बौद्धरुप॥ संत तया दारी निष्ठिताति निरंतरी। (अभंग 2560) असे अनेक दाखले देऊन वारकरी सांप्रदायातील संतांनी पांडुरंग हा बुद्ध असल्याचे सांगितले आहे.
यासंदर्भात घटनाकार डॉ.आंबेडकर म्हणतात की, विठोबाचे ‘पांडूरंग’ हे नाव पुंडरीक म्हणजे कमळ आणि कमळालाच पालिमध्ये पांडूरंग म्हणतात. म्हणजे पांडूरंग दुसरा तिसरा कुणी नसून बुद्धच होय. (डॉ.आंबेडकर चरित्र, कीर, पृ.501) इंडियन एक्टिक्वेरी(भाग दहावा) मध्येही पंढरपूर हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते, आता हिंदुंचे झाले असा उल्लेख आहे. (श्री.विठ्ठल आणि पंढरपूर, लेखक-ग.ह.खरे, पृ 149) सम्राट अशोकाने बुद्धाची 84 हजार देवळे (विहार) बांधली त्यापैकी हे एक मंदीर असावे, असे सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या मेमरी ऑफ द केवी टेम्पल या ग्रंथात हे मंदीर बौद्ध असल्याचे म्हटले आहे. (धर्मपद, अ.रा.कुलकर्णी, या ग्रंथाचे परिशिष्ठ पहा) मा.शं.मोरे आपल्या महाराष्ट्रातील ‘बुद्ध धम्माचा इतिहास’ मध्ये लिहितात की, महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा लोप झाल्यावर अनेक बौद्ध विहार, लेणी, बौद्ध धार्मिक स्थळांचे हिंदुकरण करण्यात आले. संत एकनाथ, तुकाराम हे संतश्रेष्ठच जर विठ्ठलाला बुद्धरूप मानतात तर मग पंढरपूरचे विठ्ठल मंदीर बौद्धांचा विहार होता हे सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्याची काय गरज?
भारतातील इतिहासात धार्मिक, राजकीय, सामाजिक क्रांत्या-प्रतिक्रांत्या झाल्या. यात प्रतिके आणि प्रतिमांची तोडमोड करण्यात आली. परकीय आक्रमणात अनेक धार्मिक स्थळामधील प्रतिके, प्रतिमांचे विदृपीकरण करण्यात आले. डॉ.आंबेडकरांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार असल्याचे सांगितले असले तरी, पंढरपूरची वारी करायला सांगितले नाही हे सर्वानी लक्षात ठेवावे. इतिहास म्हणून पांडुरंग म्हणजे बुद्ध असे दिसत असले तरी, त्याला आज प्राप्त झालेली भक्तीची अवस्था माणसाला विवेकाचा विसर पडावयास भाग पडते! विवेकाचा अभाव व्यक्तीला गुलाम करण्यास सोपा जातो. त्यामुळे आज खरी गरज आहे संत जनाबाई यांनी सांगितलेल्या विवेकी विचाराची कास धरण्याची. 

COMMENTS