Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा निर्घूण खून;

आरोपी पतीस सात वर्षाचा सश्रम कारावास

संगमनेर/प्रतिनिधीः चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात आपल्याच पत्नीला लोखंडी पहारीने मारहाण करीत तिचा निर्घूणपणे खून करणार्‍या आणि तिला सोडवि

सहा वाहनांचा भीषण अपघात, 4 ठार, 8 जण जखमी | LOKNews24
भंडारदरा धरणाच्या सुरक्षा भिंतेवर दारु पिणार्‍यांचा उच्छाद
 मानोरीत सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

संगमनेर/प्रतिनिधीः चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात आपल्याच पत्नीला लोखंडी पहारीने मारहाण करीत तिचा निर्घूणपणे खून करणार्‍या आणि तिला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या व्यक्तीला मारहाण करणार्‍या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, बाळासाहेब तुळशीराम फटांगरे (रा.लक्ष्मी नगर,संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बाळासाहेब फटांगरे विरोधात पोलिसांनी खून आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपी बाळासाहेब तुळशीराम फटांगरे याला सदोष मनुष्यवधाच्या तसेच घातक हत्याराने दुखापत करण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे. संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.

दि. 13 ऑक्टोंबर 2016 रोजी आरोपी बाळासाहेब तुळशीराम फटांगरे याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या राहत्या घरी त्याची पत्नी वैशाली उर्फ छाया बाळासाहेब फटांगरे (वय 35 वर्ष) हिला घरातील लोखंडी पहारीने मारहाण केली. मारहाण होते वेळी वैशालीला वाचविण्यासाठी भानुदास लालू गुंजाळ हे मध्ये पडले. ते दोघांचे भांडण मिटविण्यासाठी गेले असता त्याचा राग आल्याने आरोपी बाळासाहेब फटांगरेने त्यांना देखील लोखंडी पहारीने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.पती बाळासाहेब फटांगरे यांनी केलेल्या मारहाणीत पत्नीचा वैशाली उर्फ छाया हिचा मृत्यू झाला होता. तर भानुदास गुंजाळ यांना डोक्यात पहार लागल्याने ते जबर जखमी झाले होते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बाळासाहेब फटांगरे याच्या विरोधात सदोष मनुष्यवध आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक फौजदार विजय सरवदे आणि पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी याप्रकरणी तपास केला होता. आरोपी विरोधात शहर पोलिसांनी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. कुलकर्णी यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील जयंत दिवटे यांनी काम बघितले. त्यांना पैरवी अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे, नयना पंडित व प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादीसह मारहाणीत जखमी झालेल्या भानुदास गुंजाळ, प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकार्‍यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बाळासाहेब फटांगरे याला दोषी ठरवत भारतीय दंड विधान 1860 चे कलम 304 अन्वये दोषी ठरवत सात वर्षं सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची तसेच भारतीय दंड विधान 1860 चे कलम 326 अन्वये दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे.

COMMENTS