'ओबीसी समाजावर ब्राह्मण्यवादाचा पगडा एवढा बसलाय की, ते आपल्या हितासाठी मंडल आयोगाच्या काळातही लढायला उतरले नाहीत', राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आ
‘ओबीसी समाजावर ब्राह्मण्यवादाचा पगडा एवढा बसलाय की, ते आपल्या हितासाठी मंडल आयोगाच्या काळातही लढायला उतरले नाहीत’, राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे ब्राह्मणी शक्तींना हादरा बसल्यामुळे भाजपाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. वास्तविक, जितेंद्र आव्हाड यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यात वावगं असं काही नाही! मंडल आयोगाच्या काळापासून आम्ही स्वतः हा अनुभव घेतलाय. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहून आम्ही हा लढा देत होतो. आव्हाड म्हणाले त्याप्रमाणे महार म्हणजे बौध्दांनी हा लढा मोठ्या प्रमाणात दिला. काही प्रमाणात जागृत कुणबी समाजही थोड्याफार प्रमाणात या लढ्यात होता. मात्र, ज्यांना खऱ्या अर्थाने ओबीसी म्हणावं अशा जातींचा या लढ्यात फारसा वावर नव्हता. आंबेडकरी आणि बहुजन चळवळीने हा लढा प्रामाणिकपणे दिला. याचे मुख्य कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तनाच्या लढ्यातील मित्रशक्तींनी एकत्र येण्याचा जो संदेश दिला होता, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आजही करताहेत. त्यावेळी ओबीसी चळवळीत आम्ही मोजकेच कार्यकर्ते कार्य करित होतो. प्रा. श्रावण देवरे आणि जनार्दन पाटील यांनी मंडल आयोगावर लेखन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मोठी भूमिका महाराष्ट्रात निभावली आहे. प्रा. हरी नरके, प्रदीप ढोबळे यांच्या बरोबरीने नागपूरचे नागेश चौधरी यांनी त्याकाळी वैचारिक लढा दिला. मंडल आयोग लागू करू नये यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी आणि समाजवादी ब्राह्मणांनी देखील विरोध केला होता. ज्यात अनुक्रमे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि एस. एम. जोशी यांची नावे मंडल विरोधकांत समाविष्ट होती. या दोन्ही व्यक्तिमत्वांना पुरोगामी मानणाऱ्या साऱ्याच नेते व कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. आम्हाला आजही आठवते प्राच्यविद्या पंडित असणारे दिवंगत काॅम्रेड शरद पाटील यांनी तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा पिंपळनेर या तर्कतीर्थांच्या मुळगावीच त्यांचा पुतळा जाळण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पिंपळनेर येथील ओबीसींनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे पुतळा जाळण्याचे आंदोलन काॅ. शरद पाटील यांना सोडून द्यावे लागले होते. तीस वर्षापूर्वीच्या म्हणजे अतिशय ताज्या इतिहासात डोकावण्याचे कारण एवढेच की, जितेंद्र आव्हाड म्हणाले त्यात निश्चितच तत्थ्य आहे. प्रा. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखातून आपला सात्विक संताप प्रकट केला होता. त्यात त्यांनी ओबीसींना आरक्षणाने किती लाभ झाला याची आकडेवारी मांडली होती. ओबीसींचा लोकशाहीच्या मुख्य आधारस्तंभ असणाऱ्या संस्थात प्रवेश मिळवून देणारे आरक्षण काढून घेतल्यानंतर देखील ओबीसी सामाजिक पातळीवर सामुहिकपणे लढायला तयार नाही, ही खंत व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यांनी एखाद्याला वैयक्तिक लाभ घ्यायची वेळ आली की, तेव्हाच त्यांना ओबीसी कार्रकर्ते, नेते, चळवळ या त्रयींची आठवण होते. जितेंद्र आव्हाड मंत्री असले तरी ते आधी केंद्राच्या यादीनुसार ओबीसी आहेत. त्यामुळे, त्यांचे बोलणे हे एका ओबीसीची खंत आणि आत्मटीका देखील आहे. त्यामुळे, दुखावलेल्या ब्राह्मण्य व्यवस्थेने आपल्या ब्राह्मणी पगड्यात ऊब घेत असलेल्या ओबीसी नेत्यांना हाताशी धरून जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट करण्याचा नाहक त्रास घेऊ नये, असा आमचा त्यांना प्रामाणिक सल्ला आहे. जितेंद्र आव्हाड हे ओबीसी असले तरी आमचे त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत. त्यांची विचारसरणी समाजवादी असली तरी ओबीसींचा सामाजिक न्याय हिरावून घेणाऱ्या शरद पवार यांच्या सोबत राहून वैयक्तिक लाभार्थी झाले आहेत. शरद पवार हे आव्हाड यांचे नेते स्वतः ब्राह्मण्यवादाच्या कच्छपि लागलेले नेते आहेत. लालूप्रसाद, मुलायमसिंह, शरद यादव, नितीशकुमार, अशा प्रभावी ओबीसी राजकीय नेत्यांसारखा ब्राह्मण्यवादाशी लढण्याचा शरद पवार यांचा इतिहास नाही. पवारांचे सारेकाही गुपचूप की चिडीया असते. आव्हाड यांनी यावरही एकदा ठासून बोलावं!
COMMENTS