Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजपचे पुन्हा धक्कातंत्र !

भाजप हा संपूर्णवेळ राजकारण करणारा आणि धुर्त व चाणाक्ष असा पक्ष आहे. राजकारण हा फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नसून तो पूर्ण वेळ करण्याची गरज असल्य

समस्येचे नशीब
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकिय शिक्षणाचे भवितव्य अधांतरी
राजकारणाचे बाजारीकरण

भाजप हा संपूर्णवेळ राजकारण करणारा आणि धुर्त व चाणाक्ष असा पक्ष आहे. राजकारण हा फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नसून तो पूर्ण वेळ करण्याची गरज असल्याचे सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी अधोरेखित केले होते. तोच कित्ता भाजप गिरवतांना दिसून येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होईल याची चर्चा सुरू असतांनाच भाजपने प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची निवड करून अनेकांना धक्का दिला. मुळातच भाजपने यापूर्वी देखील राजस्थानात भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड करून वसुधरा राजे यांना मोठा धक्का दिला होता. खरंतर भाजप प्रस्थापित राजकारण मोडीत काढत आला आहे. खरंतर राजस्थानात वसुंधरा राजे या मुख्यमंत्रीपदाच्या मुख्य उमेदवार होत्या आणि मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल असे वाटत असतांनाच भाजपने त्यांचे प्रस्थ मोडीत काढत प्रथम आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली. वास्तविक पाहता ही मक्तेदारी मोडीत काढत पक्षाचे हित बघण्याची खरी गरज असते, तरच पक्ष वाढतो, संघटन वाढते आणि पक्ष मजबूत होतो. त्यामुळेच भाजप हा धुर्त पक्ष असल्याचे सिद्ध होते. खरंतर 2014 पासून काँगे्रसला घरघर लागली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे काँगे्रसचे प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात सरंजामदार नेते तयार झाले होते. अनेक पदे त्यांनी आपल्याच घरात लाटली. शिवाय पदे केवळ आपल्या मर्जीतील नेत्यांना देण्यात धन्यता मानली. त्यामुळे सत्तेची फळे सर्वसामान्यांना चाखायलाच मिळाली नाही, परिणामी हेच सरंजामदारी नेते मोठे झाले, सर्वसामन्य मोठा झालाच नाही, त्यामुळेच काँगे्रसला घरघर लागली होती. महाराष्ट्रातच प्रथमच काँगे्रसने एका सर्वसामान्य घरातील म्हणजेच हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवत एक नवा संदेश दिला आहे. मात्र असे बदल भाजपने यापूर्वीच केले आहेत. तोच कित्ता पुन्हा एकदा दिल्लीत बघायला मिळाला. अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. तेच मुख्यमंत्री होतील असे अनेकांना वाटत असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री करण्यासाठी रेखा गुप्ता यांचे नाव सुचवले आणि भाजपने त्यावर शिक्कामोर्तब केले. भाजपच्या सुषमा स्वराज, काँगे्रसच्या शीला दीक्षित आणि आपच्या आतिशी यांच्यानंतर दिल्लीचे सूत्रे स्वीकारणार्‍या त्या चौथ्या महिला ठरल्या आहेत. मुळातच भाजप आणि संघाने रेखा गुप्ता यांची निवड करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप महिला सक्षमीकरणाचे उदाहरण समोर ठेवतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता भाजपने अनेक राज्यांत महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना सादर केल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रात यशस्वी ठरत आहे, मात्र त्यापूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपने ही योजना दिल्लीत राबवण्याचा निर्धार केला होता. परिणामी दिल्लीत देखील महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केले, त्यामुळेच भाजपने दिल्लीत महिला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला आहे. या राज्यात भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे दिल्लीत आपने सर्वप्रथम रेवडी संस्कृतीला जन्म दिला. आपनेच लाडकी बहीण योजना सर्वप्रथम दिल्लीत राबवली, त्यासोबत मोफत शिक्षण 200 युनिट वीज मोफत या योजनामुळेच आप राजधानी दिल्लीत 10 वर्षे सत्ता उपभोगु शकली. मात्र त्या योजनांचा अभ्यास करून भाजपने पुन्हा आपल्याकडे महिलांना आकर्षित करण्यात यशस्वी होत सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपने आपली सत्ता मिळवली. खरंतर या निवडणुकीत काँगे्रस कुठेही दिसली नसली तरी, काँगे्रस आपच्या जागा कमी करण्यात यशस्वी ठरली आहे. तसेच आपवर भ्रष्टाचाराचे आरोप मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा एकदा जोमाने लढावे लागणार आहे, अन्यथा आपचे दिल्ली मॉडेल अपयशी ठरल्यानंतर इतर राज्यांत आप पुढे काय करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS