मुंबई ः गेल्या अनेक दशकात बँकिग व्यवस्थेवर अनेक संकटे कोसळली, मात्र रिझर्व्ह बँकेमुळे देशातील बॅकिंग व्यवस्था मजबूत राहिली. आज भारताची बँकिंग व्य

मुंबई ः गेल्या अनेक दशकात बँकिग व्यवस्थेवर अनेक संकटे कोसळली, मात्र रिझर्व्ह बँकेमुळे देशातील बॅकिंग व्यवस्था मजबूत राहिली. आज भारताची बँकिंग व्यवस्था मजबून आणि शाश्वत व्यवस्था मानली जाते. जी व्यवस्था डबघाईस आली होती, ती आता नफ्यात आली आहे आणि नवा विक्रम प्रस्थापित करत आहे, गेल्या 10 वर्षात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. आमच्या नीतीमध्ये स्पष्टता होती, असे प्रतिपादन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचा सोमवारी 90 वा वर्धापन दिन होता. यानिमित्त मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारताचा नारा दिला. तसेच मोदी म्हणाले विकसनशील भारताचा विकसित भारत होण्याच्या प्रवासात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका असेल. रिझर्व्ह बँकेने गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची बँकिंग व्यवस्था आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, गेल्या 10 वर्षांमध्ये आपण केलेली कामं केवळ एक ट्रेलर आहे. चित्रपट येणे अद्याप बाकी आहे. 2014 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या 80 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. तेव्हाची परिस्थिती थोडी वेगळी होती. तेव्हा आपल्या बँकिंग क्षेत्रासमोर अनेक आणि मोठी आव्हानं होती. एनपीए आणि अस्थिर प्रणालीमुळे देशाची जनता भारताच्या बँकिंग क्षेत्राच्या भविष्याबाबत चिंतेत होती. कोलमडलेल्या बँकिंग क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला कोणतंही सहाय्य मिळत नव्हतं. देश एकाच वेळी दोन-दोन आघाड्यांवर लढत होता. परंतु, गेल्या 10 वर्षांमध्ये स्थिती सुधारली आहे. आरबीआय आणि सरकारने मिळून केलेल्या कामांमुळे देशाच्या बँकिंग क्षेत्राने भरारी घेण्यास सुरुवात केली आहे.जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात जे काही चढ-उतार होत आहेत, मंदीसारखी आव्हाने येत आहेतच, या सगळ्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम व्हावा यासाठी आपण काय करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण काय काय करू शकतो ते ठरवा, आपण नवीन क्षेत्रांमध्ये काय करू शकतो त्याबाबत विचार करून ठेवा. कारण पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी आपण या क्षेत्रासाठी नवे निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य देखील पंतप्रधान मोदी यांनी केले.
90 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 90 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी केले. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे होते. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसर्या बाजूला 90 रुपये असे लिहिलेले आहे.
COMMENTS