बीड । प्रतिनिधीबीड नगर परिषदेमधील सफाई कामगार व इतर कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खेमाडे या

बीड । प्रतिनिधी
बीड नगर परिषदेमधील सफाई कामगार व इतर कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खेमाडे यांनी केला असून, याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला आहे.
सध्या शहरात विविध राजकीय मोहिमांच्या नावाखाली सफाई कामगार व कर्मचारी यांच्याकडून दिवस-रात्र काम करून घेतले जात असल्याचे चित्र आहे. ठरलेल्या वेळेपलीकडेही अचानक कामावर बोलावले जाते. साहेबांनी बोलावलं आहे या नावाखाली तातडीचे आदेश देण्यात येतात. ही सेवा की हुकूमशाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. धोकादायक परिस्थितीत काम करून घेत असताना मास्क, हातमोजे (ग्लोव्हज), सुरक्षित शूज यांसारखी मूलभूत सुरक्षा साधने दिली जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. केवळ गणवेश घालून फोटोसेशन केले जाते; मात्र प्रत्यक्ष सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, अशी चर्चा कर्मचार्यांत आहे. कचरा उचलताना संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. एखाद्या कर्मचार्याला गंभीर आजार झाला किंवा जीवितहानी झाली, तर जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी कर्मचार्यांना झालेल्या हाणामारीचे प्रकार दडपले जात असल्याचेही आरोप समोर येत आहेत. जर असे प्रकार खरे असतील तर ते लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारे आहेत. सत्य कितीही दडपले तरी ते बाहेर येते, असे खेमाडे यांनी स्पष्ट केले. शहरातील कचरा योग्य व्यवस्थापन न करता तो थेट बिंदुसरा नदी परिसरात टाकला जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत आहे. कचरा टाकण्यासाठी निश्चित जागा ठरवून वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असताना प्रशासन बेपर्वाई का करत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. खेमाडे यांनी पुढील मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे : सर्व सफाई कामगार व कर्मचार्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे. कामाच्या ठिकाणी उउढत व स्वतंत्र चौकशी यंत्रणा उभी करून हाणामारी किंवा दबावाच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी. नियमित आरोग्य तपासणी व विमा संरक्षण लागू करावे. कामाचे निश्चित वेळापत्रक पाळून अतिरिक्त कामासाठी योग्य मोबदला द्यावा. कचरा व्यवस्थापनासाठी अधिकृत जागा निश्चित करून नदीप्रदूषण तात्काळ थांबवावे. गरिब कुटुंबातून आलेले सफाई कामगार व कर्मचारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जीव धोक्यात घालतात. त्यांच्यावर दबाव टाकणे किंवा अमिष दाखवून काम करून घेणे ही अन्यायाची परिसीमा असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने हुकूमशाही बाजूला ठेवून नियमांनुसार कामे करावीत व गोरगरीब कर्मचार्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS