Homeताज्या बातम्या

अविमुक्तेश्‍वरानंद यांना नोटीस ‘शंकराचार्य’ असल्याचा पुरावा सादर करण्याचे आदेश

प्रयागराज : माघ मेळ्यात पालखी अडवण्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कथित शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना माघ मे

Solapur : वीज पुरवठा आठ तास न केल्याने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे (Video)
अबला महिला की पुरूष?
पिंपरी निर्मळ येथील गुन्ह्यातील 57 आरोपींना अटकपूर्व जामीन

प्रयागराज : माघ मेळ्यात पालखी अडवण्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कथित शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना माघ मेळा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये 24 तासांच्या आत आपण ‘खरे शंकराचार्य’ असल्याचा वैध कायदेशीर पुरावा सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
मौनी अमावस्येच्या दिवशी संगमाकडे जाणारी त्यांची पालखी पोलिसांनी थांबवल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. पोलिसांनी पायी जाण्याची सूचना दिली असताना शिष्यांनी त्याला विरोध करत पालखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ अविमुक्तेश्‍वरानंद यांनी धरणे आंदोलन सुरू करून अटक केलेल्या शिष्यांची मुक्तता करण्याची मागणी केली. सुमारे दोन तास परिसरात तणाव कायम राहिला. अखेरीस पोलिसांनी अतिरिक्त समर्थकांना ताब्यात घेऊन पालखी संगमापासून दूर नेली. या गोंधळामुळे अविमुक्तेश्‍वरानंद यांना संगमस्नान करता आले नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, माफी मिळेपर्यंत आश्रमात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले. भविष्यात मेळ्याला येणार असलो तरी शिबिरात न राहता गरज पडल्यास रस्त्यावर वास्तव्य करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री प्रशासनाने नोटीस देण्याचा प्रयत्न केला असता शिबिरात कोणी उपलब्ध नसल्याचे सांगून ती स्वीकारण्यास नकार देण्यात आला. मंगळवारी सकाळी अधिकारी पुन्हा पोहोचल्यावर शिबिराच्या प्रवेशद्वारावर नोटीस चिकटवण्यात आली. ही नोटीस माघ मेळा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांच्या आदेशाने जारी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, शंकराचार्य पदासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून 14 ऑक्टोबर 2022 च्या आदेशानुसार अंतिम निकाल येईपर्यंत कोणालाही स्वतःला शंकराचार्य घोषित करता येणार नाही. तसेच पदग्रहण किंवा पट्टाभिषेक यासही मनाई करण्यात आलेली आहे आणि या आदेशात आजपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. असे असतानाही मेळ्यातील छावणीत लावलेल्या फलकावर स्वतःचा उल्लेख ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य असा केल्यामुळे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याच कारणास्तव नोटीस देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पुढील कारवाई पुराव्याच्या आधारे ठरणार असल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.

COMMENTS