महाराष्ट्राचे राजकारण आपण बोटाच्या इशाऱ्यावर खेळवतो असा अतिआत्मविश्वास असणाऱ्या शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर ज्या पध्दतीने नियंत्रण प्रस्थाप
महाराष्ट्राचे राजकारण आपण बोटाच्या इशाऱ्यावर खेळवतो असा अतिआत्मविश्वास असणाऱ्या शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर ज्या पध्दतीने नियंत्रण प्रस्थापित केले होते, त्याविरोधात आमदारांमध्ये वाढणारी नाराजी थेट बंडखोरीच्या माध्यमातून व्यक्त झाली. याचा परिणाम राज्यात सरकार कोसळणार इथपासून ते विधानसभा बरखास्तीपर्यंत कोणत्याही शक्यतेपर्यंत पोहचला आहे. शरद पवार यांनी २०१४ पासूनच शिवसेनेला राजकीयदृष्ट्या ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. २०१४ मध्ये भाजप-सेना यांचे मिळून बहुमत होत असताना शरद पवार यांनी भाजपला विनाशर्त पाठिंबा देऊन भाजपचे सरकार राज्यात गठन केले होते. त्याचा परिणाम नंतर सेनेला दुय्यम भूमिका घेऊन सत्तेत वावरावे लागले. त्यानंतर २०१९ मध्ये देखील पहाटेचा शपथविधी उरकून अजित पवार यांनी सेनेला पुन्हा शह दिला. अर्थात, हा पहाटेचा शपथविधी औटघटकेचा ठरला होता, हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादी पक्षाने राज्यात महाविकास आघाडी सरकारचे गठन करून सेनेवर एकप्रकारे नियंत्रणही ठेवले. सत्तेत मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी पाॅवरफूल मंत्री म्हणून राष्ट्रवादीचा वावर होता. त्याचा परिणाम निधी लांबवण्यापासून तर वाटपापर्यंत राष्ट्रवादीचा जो हस्तक्षेप सुरू होता, त्याविरोधात सेना आमदारांमध्ये नाराजी वाढीस लागली होती. याशिवाय, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा, विधानपरिषद निवडणूकीत सेनेला तोंडावर पाडण्याचा डाव हा फडणवीस यांच्यापेक्षाही पवार यांनीच खेळल्याची भावना शिवसेना आमदारांमध्ये जोर पकडत होती. त्याचा अविभाज्य परिणाम या बंडाळीला एक आयाम देत सत्ता बदल घडवून आणणे, ही खरेतर शिवसेनेची अंतर्गत रणनीती बनली असावी. त्याला चेहरा फक्त एकनाथ शिंदे यांचा दिला, एवढेच. सेना आपल्या सोबत फरफटत आली नाही, तर, आपण भाजपला केव्हाही पाठिंबा देऊन सत्ताबदल घडवू शकतो, ही गृहीत धमकी, हेच राष्ट्रवादी आणि त्यांचे नेते शरद पवार यांचे भांडवल होते; तेच शिवसेनेने उद्धवस्त केल्याचे दिसते. राजकीय मुत्सद्दीपणा पेक्षाही मुत्सद्दी मग्रुरी राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचा हा परिणाम आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय महानाट्य वरकरणी बंडखोरी वाटत असली तरी ती शिवसेनेची ठरवलेली रणनिती असून, या अंतर्गत भाजपासोबत सत्तेत राहणे अधिक परवडेल, ही भावना केवळ शिवसेना आमदारांतच नव्हे तर नेतृत्वातही निर्माण झाली असल्याचे, हे संपूर्ण प्रकरण द्योतक म्हणावे लागेल! शिवसेना एवढ्या निर्णायक अवस्थेला का पोहचली असेल, याची कारणमीमांसा करताना नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणूकींकडे बोट दाखवता येईल. राज्यसभा निवडणूकीत सेनेने दिलेले अतिरिक्त उमेदवार संजय पवार यांना निवडून आणण्याच्या रणनितीत शरद पवार यांनी साथ दिली नाही, ही भावना सेनेत निर्माण झाली होती. तरीही, त्यांनी विधानपरिषद निवडणूक आजमावण्याचे धोरण ठेवले असावे. परंतु, यात धोका झाला तर आपल्या निर्णायक खेळीचे अस्त्र उपसावे, असा राजकीय धूर्तपणा उध्दव ठाकरे यांनी योग्यवेळी अंमलात आणला. चुप्पी साधून थेट कृतीतून व्यक्त होणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या रणनितीचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही; तो यावेळीही त्यांनी दाखवून दिला. विधानपरिषद निवडणुकीत सेनेचे उमेदवार निवडून आले असले तरी आघाडीतील काॅंग्रेस उमेदवार पराभूत करण्यात आलेल्या कृतीचा दोष राष्ट्रवादीकडे बोट दाखवून दिला जात आहे. याचा अविभाज्य परिणाम राष्ट्रवादी पासून स्वतः:ची सुटका करून घेण्याची मानसिकता शिवसेना नेतृत्वातच बळावली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच परिणाम राज्यात आजचे राजकीय महानाट्य उभे राहण्यात झाला असावा. जर ही बंडखोरी भाजपाने घडवून आणली असती तर, देवेंद्र फडणवीस हे अधिक आक्रमकपणे व्यक्त झाले असते. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे़ याप्रकरणावर अपवाद वगळता असणारे मौन फार बोलके आहे की, हे बंड ही शिवसेनेचीच रणनिती असून त्यास शरद पवार यांचे धोकेबाज राजकीय मुत्सद्दीपण कारणीभूत आहे, अशीच या प्रकरणात शक्यता आहे!
COMMENTS