आष्टी शहर ते शिदेवाडी फाटा या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या मार्गावर तब्बल 1,500 खड्डे पडल्याने प्रवाशांचा ज

आष्टी शहर ते शिदेवाडी फाटा या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या मार्गावर तब्बल 1,500 खड्डे पडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, कामगार तसेच एमआयडीसीतील कर्मचारी यांना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. संपत शिवाजी सायकड (रा. आष्टी) यांनी तहसीलदार आष्टी यांना निवेदन देऊन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. निवेदनात नमूद केले आहे की, आष्टी-शिदेवाडी फाटा हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून सुमारे 50 गावांतील नागरिकांची दैनंदिन वाहतूक याच रस्त्यावरून होते. याच मार्गावर शासकीय आयटीआय व एमआयडीसी परिसर असल्याने विद्यार्थी व कामगारांची मोठी वर्दळ असते. निवडणूक काळात मतमोजणी प्रक्रिया याच ठिकाणी पार पडत असल्याने या मार्गाचे महत्त्व अधिक वाढते. गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांची संख्या झपाट्याने वाढत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अर्जदार संपत शिवाजी सायकड आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे. तसेच केवळ तात्पुरती खड्डे बुजविण्याची उपाययोजना न करता आष्टी-शिदेवाडी फाटा रस्त्याचे रुंदीकरण करून नव्याने दर्जेदार डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करावा, अशी ठाम मागणीही नागरिकांनी केली आहे. वाढती वाहतूक आणि औद्योगिक व शैक्षणिक परिसर लक्षात घेता या रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

COMMENTS