अल कायदाचा प्रमुख आणि क्रूर दहशतवादी अल जवाहिरीचा खात्मा करण्यात अमेरिकेला मोठे यश मिळाले आहे. ओसामा बिन लादेनचा शेवट केल्यानंतर अमेरिकेने जवाहिरीचा
अल कायदाचा प्रमुख आणि क्रूर दहशतवादी अल जवाहिरीचा खात्मा करण्यात अमेरिकेला मोठे यश मिळाले आहे. ओसामा बिन लादेनचा शेवट केल्यानंतर अमेरिकेने जवाहिरीचा केलेला खात्मा करून अल कायदाचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र यामुळे अल कायदा संपली असे नाही, तर जवाहिरीच्या जागेवर दुसरा प्रमुख म्हणून नियुक्त देखील होईल. त्यामुळे दहशतवादाविरोधातील ही लढाई दीर्घकालीन लढाई लढावी लागणार आहे. दहशतवाद काही एका दिवसांत, एका हल्ल्यात संपत नसतो. तर तो ऐन-केन प्रकारे आपले संघटन वाढवत दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर देखील ही लढाई संपणारी नाही.
अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य मागे बोलावण्याची घाई केल्यानंतर आणि अफगाणिस्तान तालिबान्यांना सोपवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यामुळे दहशतवादाविरोधाची अमेरिकेची लढाई मागे पडली की काय, असे संपूर्ण जगाला वाटत होते. त्यानंतर जवाहिरीचा केलेला खात्मा या शक्यतेला छेद देणारे आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला करत, आपल्या विस्तारवादी महत्वाकांक्षेचे उदाहरण समोर ठेवले आहे. तर दुसरीकडे चीन देखील आपले आजुबाजूचे छोटे-छोटे देश गिळंकृत करायला निघाला आहे. अशावेळी अमेरिकेने जवाहिरीचा केलेला खात्मा आणि तैवान संदर्भातील घेतलेली भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे. चीनने विरोध केल्यानंतर देखील अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. तैपईच्या विमानतळावर पलोसी उतरल्यानंतर चीनने आगपाखड करण्यास सुरुवात केली असून तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली. आधीच युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या संघर्षांमुळे जग पोळले असताना चीन आणि अमेरिकेत वाढता तणाव आशिया खंडासाठी नवी युद्धचिंता घेऊन आला आहे. मात्र यात अमेरिकेने घेतलेली खंबीर भूमिका आणि चीनसारख्या देशाच्या दबावाला बळी न पडण्याची भूमिका यामुळे अमेरिका पुन्हा एकदा जगभरात विश्वासार्ह देश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र ही शक्यता अमेरिका किती दिवस टिकवतो, यावर सारे काही अवलंबून असणार आहे. जवाहिरीला अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी दिलेला आश्रय हा भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमा एकमेकांना जोडलेल्या असून, अफगाणिस्तामध्ये जर दहशतवादी आश्रय घेऊन लागले, तर त्यांना भारतात हल्ले करणे, हल्ल्याची रणनीती ठरवणे सहज-सोपे जाऊ शकते. त्यामुळे एकीकडे जर्जर झालेला पाकिस्तान आणि दुसरीकडे अफगाणिस्तामधून वाढत्या दहशतवादी कारवाया आणि चीनचे विस्तारवादी धोरण, भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. काही भारतीय मुत्सद्दी अधिकार्यांनी सांगितले, की जवाहिरीच्या हत्येमुळे भारतातील ‘अल-कायदा’समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जवाहिरी हा अल कायदामध्ये असतांना ओसामा बिन लादेन याची सावली होता. किंबहुना, किंबहुना, जवाहिरीला ‘बिन लादेनमागचा माणूस’ म्हणून ओळखले जात होते. जवाहिरी अल कायदाचा प्रमुख म्हणून प्रभावी होता आणि त्याला बिन लादेननंतरच्या अल कायदामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. तथाकथित इस्लामिक स्टेटच्या हॉलीवूड सारख्या उदयापुढे त्याने गती गमावली असतानाही गट तुलनेने अबाधित ठेवणे, त्याच्यापुढे आव्हान होते, त्यात तो यशस्वी झाला होता. भारतामध्ये हिजाब प्रकरण उद्धभवल्यानंतर तो आक्रमकपणे व्हिडिओतून धर्मांध तरूणांना पेटवण्याचे काम करत होता. अगदी अलीकडे तो भारतात ‘अल कायदा’ची पाळेमुळे पसरवण्याचा प्रयत्न करत होता आणि ‘अल-कायदा’च्या संघटनात्मक व्यवस्थेच्या पुनर्रचनेसाठी प्रयत्न करत होता. त्याचा भारतीय उपखंडातील ‘अल-कायदा’च्या प्रादेशिक सहयोगी संघटनांच्या रचनेवरही विपरित परिणाम होऊ शकतो. जवाहिरी काबूलच्या एका उच्चभ्रू भागात राहत होता, यावरून तालिबान आणि अल-कायदा यांच्यातील जवळचे संबंध दिसून आले. हे जवळचे संबंध भारतीय हिताच्या विरोधातच आहेत. जे तालिबान ‘अल-कायदा’ला आश्रय देते, ते प्रामुख्याने भारताला लक्ष्य करणार्या ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तैयबा’सारख्या पाकिस्तानस्थित संघटनांनाही अशाच सुविधा देण्याचा धोका आहे.
COMMENTS