राजकारणाचे बाजारीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकारणाचे बाजारीकरण

पूर्वी विकासासाठी राजकारण केलं जायचं. समाजाचे हित साधण्यासाठी राजकारण हा केंद्रबिंदू असायचा. मात्र आता राजकारणात व्यावसायिकता आली आहे. राजकारण हा फाव

मंदीचे सावट गडद
चीनमधील निर्बंध आणि कोरोना उद्रेक
वायूप्रदूषण चिंताजनक  

पूर्वी विकासासाठी राजकारण केलं जायचं. समाजाचे हित साधण्यासाठी राजकारण हा केंद्रबिंदू असायचा. मात्र आता राजकारणात व्यावसायिकता आली आहे. राजकारण हा फावल्या वेळेत करण्याचा उद्योग राहिला नसून, तो पूर्णवेळ करण्याचे साधन बनला आहे. पण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जे राजकारण सुरु आहे, त्यातून राजकारणाचे व्यावसायिकीकरण नव्हे तर बाजारीकरण झाल्याचे खेदाने म्हणावे लागते. एका नेत्याच्या आरोपाला-उत्तर देण्यासाठी दुसर्‍या नेत्याने पत्रकार परिषद घ्याव्या, सभा घ्याव्या, नित्याचेच झाले आहे. मात्र कधी कुणी विकासाच्या मुद्दयावर, शहरातील राज्यातील मुद्दयावर सभा घ्याव्या वाटत नाही.
दसरा मेळाव्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांत जे रणकंदन सुरु आहे, त्यातून राज्य कुठे चालले आहे, किंंबहून आपण राज्याला कुठे घेऊन चाललो आहो, असा सवाल विचारावा लागेल. राजकारणांची पातळी पार घसरली आहे. ’सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घटकाच्या प्रभावाने विशिष्ट विचार अंगीकारुन विशिष्ट समाज, समुह, संस्था, भूभाग यावर सत्ता मिळविण्यासाठी व सत्ता, प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण, अशी साधारण राजकारणांची व्याख्या करता येईल. महाराष्ट्र राज्याला समर्थ असा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय असा वारसा आहे. हा समृद्ध वारसा जपण्याची गरज असतांना, आपल्या गटारगंगाने चिखलफेक करण्यात काय अर्थ आहे. बरं ही चिखलफेक एकाच पक्षाकडून होत नाही. तर ती सर्वच पक्षांकडून होतांना दिसून येत आहे. एकाने चिखल फेकला की, दुसरा अजून जास्त चिखल उडवतो. पुन्हा तोच नव्या दमाने नवा चिखल उडवतो. ही स्पर्धा सुरु झाली आहे. ही स्पर्धा न संपणारी आहे. राजकारणात कधी काळी एकमेकांवर टीका करायची आणि रात्री एकमेकांच्या घरी जायचे, विचारविनिमय करायचे, इतकी खिलाडूवृत्ती होती. मात्र आता पातळी सोडून राजकारणामुळे ही सभ्यता राहिली नाही. राजकारण फक्त निवडणुकीपुरते किंवा लढायांपुरते मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणे व हेतू असणे आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे. असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणे गरजेचे आहे. काही दशकांपूर्वी पक्षावर टीका व्हायची. त्यानंतर या टीकची जागा व्यक्तीगत पातळीवर घसरण्याने घेतली. आता तर या स्पर्धेने ऐकमेकांना आरेे-कारे, महिलांविषयी अर्वाच्च बोलण्याची स्पर्धाच सुरु आहे. या टीकेतून कोणाला किती सुसंस्कृत म्हणावे हा प्रश्‍न पडतो. पक्षाचे आयटी सेल काय, ट्विटवर हँडलवरून राबविणार्‍या मोहिमा, यातून एखाद्याचे चरित्र्यहनन करायचे, याची स्पर्धाच सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकारणांने अनेक वाद पाहिले. पवार विरुद्ध ठाकरे, मैद्याचे पोते म्हणून शरद पवारांची संभवना, अत्रे विरुद्ध ठाकरे, मुंडे विरुद्ध पवार असे अनेक वाद महाराष्ट्राने पाहिले. मात्र या नेत्यांनी इतक्या खालच्या पातळीवर कधी टीका केली नाही. त्यांची टीका लोकांना रंजक वाटायची, हास्याचे फवारे उडायचे, आणि लोक विसरुन जायचे. मात्र या सर्वांचे सख्य होते. विकासाच्या मुद्दयावर सर्व एकत्र येऊन चर्चा करायचे. मात्र आज ही परिस्थिती दिसत नाही. महाराष्ट्राच्या मुद्दयावर सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र ती भूमिका आता सर्व पक्षांची दिसत नाही. महाराष्ट्र राज्य अशा वृत्तीने डबघाईला जाईल की काय, अशी शंका वाटायला लागते. महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर गुंतवणूक आणावी लागणार आहे, त्याशिवाय मोठे प्रकल्प, शिक्षणांचे हब, बनविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. मात्र ती मानसिकता सर्वच पक्षांतील नेत्यांनी दाखवण्याची गरज आहे. सत्तेसाठी हपापलेपण नको, तर विकासासाठी लढण्याची गरज आहे, त्यातून सत्ता आपोआप मिळत जाते. मात्र विकासाची भूमिका सोडून सर्वंच पक्षांनी राजकारणाचे बाजारीकरण करण्याची स्पर्धांच लावल्याचे दिसून येते.

COMMENTS