वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचताना दिसत असून त्याचे पडसाद संपूर्ण मध्यपूर्वेवर उमटत आहेत. आधीच इराणच्या साग

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचताना दिसत असून त्याचे पडसाद संपूर्ण मध्यपूर्वेवर उमटत आहेत. आधीच इराणच्या सागरी सीमेजवळ दाखल झालेल्या यूएसएस अब्राहम लिंकन या एअरक्राफ्ट कॅरियरनंतर आता आणखी एका अमेरिकन युद्धनौकेच्या हालचालींनी खळबळ उडवून दिली आहे. ही युद्धनौका थेट तेहरानच्या दिशेने रवाना झाल्याचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी एका वक्तव्यात म्हटले की, आणखी एक शक्तिशाली आणि आधुनिक युद्धनौका सध्या इराणकडे जात आहे. इराणने शहाणपणाने निर्णय घ्यावा आणि व्यवहाराच्या मार्गावर यावे, अशीच आमची अपेक्षा आहे. करारांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी इराणवर अप्रत्यक्ष टीकाही केली. जर इराणने यापूर्वीच योग्य करार मान्य केले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती, असे सूचक विधान त्यांनी केले. ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेला अमेरिकेतील प्रभावी रिपब्लिकन नेते आणि सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी उघड पाठिंबा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिले की, इराणमधील आंदोलनकर्ते हे अमेरिकेचे संभाव्य मित्र ठरू शकतात, मात्र अयातुल्ला नेतृत्वाखालील सत्ताधारी व्यवस्था कधीही विश्वासार्ह भागीदार ठरू शकत नाही.
दरम्यान, संभाव्य अमेरिकन हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनेई हे राजधानी तेहरानमधील एका अंडरग्राउंड बंकरमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानुसार, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या तिसर्या पुत्राकडे दैनंदिन प्रशासकीय जबाबदार्या सोपवण्यात आल्या आहेत.
इराणमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या देशव्यापी विरोध आंदोलनांनी परिस्थिती अधिकच चिघळवली आहे. वाढती महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी याविरोधात डिसेंबर अखेरीस उसळलेल्या या आंदोलनांना सरकारने कठोरपणे दडपले. अमेरिकास्थित मानवी हक्क संस्थांच्या अहवालानुसार या कारवाईत 6 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, इराण सरकारने अधिकृतरीत्या जाहीर केलेली आकडेवारी यापेक्षा निम्म्याहून कमी आहे. एकीकडे देशांतर्गत अस्थिरता आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय दबाव-या दुहेरी कोंडीत सापडलेल्या इराणसमोर पुढील काळात कोणता मार्ग निवडला जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या युद्धनौकांच्या हालचाली केवळ शक्तिप्रदर्शन आहेत की संभाव्य संघर्षाची नांदी, हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे.

COMMENTS