Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानवता हेच अधिष्ठान स्वीकारा !

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित निघालेल्या चित्रपटाच्या अनुषंगाने, निर्माण झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही. अर्थात, ऐतिहासिक व्यक्त

तनपुरे कारखाना बंद पाडणार्‍यांची चौकशी करा – विखे समर्थकांची मागणी
तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, १४ फेब्रुवारी २०२२ l पहा LokNews24
सात वर्षाच्या पुतणीसोबत काकाच करत होता ‘हे’ कृत्य | LOKNews24

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित निघालेल्या चित्रपटाच्या अनुषंगाने, निर्माण झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही. अर्थात, ऐतिहासिक व्यक्तिमत्व आणि भारतीय समाज जीवनाच्या एकूण सांस्कृतिक संघर्षात आणि मानव अधिकाराच्या रूपामध्ये त्यांनी केलेला संघर्ष, हा त्याकाळी देखील अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीच्या विरोधात होता. तत्कालिन वास्तव आजही बदललेले आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही. सामाजिक परिस्थिती आज काही फरकाने बदललेली दिसत असली तरी, मानसिक अवस्थेत तिचे रूपांतर अजूनही मानवी समाजाच्या कल्याणाच्या रूपात किंवा मानवतेच्या रूपामध्ये झालेले नाही. शोषण-पिळणाचा समाज व्यवस्थेचा गाभा आजही आपले रूप बदलून आहे त्या स्थितीला पुढे नेतो आहे. ही परिस्थिती बदलणं ही काळाची गरज जशी आहे, तशी आधुनिक काळामध्ये समग्र मानवी समाजाची ती गरज आहे. याशिवाय, मानवी समाज संस्कृतीला पुढे जाता येणार नाही; ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्यावी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशामध्ये शिक्षणाचा पहिला अधिकार जो स्त्रियांना मिळवून दिला, त्यासाठी केवळ ते अधिकारासाठी लढले नाहीत; तर, त्यांनी स्वतः शाळा निर्माण केली आणि जेव्हा या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीमाई फुले या जात होत्या, त्यावेळी त्यांना रस्त्याने कोणत्या संकटांना सामोरे जावं लागलं, हे ऐतिहासिक वास्तव आपल्या सगळ्यांसमोर आहे! अशी परिस्थिती आजही निर्माण झाली तर कोणतीही स्त्री घरातून बाहेर पडेल, असं वाटत नाही. परंतु, त्या काळात सावित्रीमाई फुले यांनी दाखवलेली हिम्मत, आजही कौतुकास्पद आहे. त्यांनी दाखवलेल्या हिम्मतीचे, जे आजही समाजाला कौतुकास्पद आहे, त्याचं वास्तव चित्रपटांमधून जर चित्रित करण्यात आलं असेल तर, ते दाखवणे काही गैर नाही! इतिहासाचं वास्तव आपण बदलू शकत नाही आणि ते वास्तव आपल्याला नको असेल, तर, वर्तमान काळामध्ये समाज जीवनाच्या समग्र रचनेमध्ये बदल करायला आपण पुढे सरसावलं पाहिजे! जर यापैकी कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण समाज म्हणून धजावत नसू तर, आपण आपल्यासारखे मूर्ख ठरणारे अन्य कोणतेही घटक असणार नाही. समाज जीवन हे नेहमी सरळ रेषेत जात नाही. हृदयाची रेखा देखील सरळ रेषेत नसते. जेव्हा उंच सखल आलेख हृदयाचा येतो, तेव्हाच माणूस जिवंत असल्याचं ते लक्षण असतं आणि त्यामुळे समाजाचा सामाजिक आलेख देखील उंचसखल असतो. त्याशिवाय तो समाज जिवंत आहे, याची साक्ष पटत नाही. त्यामुळे समाज जीवन अधोरेखित होत असताना त्याच्यातील संघर्ष निश्चितपणे कायम असतील. परंतु, त्या संघर्षाचे स्वरूप मानवतेच्या आधारावर आता आपण निश्चित करायला व आधुनिक जीवनमूल्य जी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये फार प्राचीन काळापासून आहेत, त्यांचा स्वीकार करताना मानवता हा त्याचा गाभा जर आपण ठेवायचा म्हटला, तर, समाजातील सर्व वाईट प्रथा आपल्याला उच्चाटन करून काढून टाकल्या पाहिजेत. हे वास्तव आपण सगळ्यांनी स्वीकारणं गरजेचे आहे. महात्मा फुले यांच्या चित्रपटातील कोणत्याही दृश्याला आता आक्षेप घेणे हे थांबवायला हवं आणि त्याचप्रमाणे इतिहासाचं वाचन करणारा समाज जर हळूहळू लयास जात असेल तर, त्याला इतिहासाचे स्मरण करून देणारे वास्तव, दृकश्राव्य माध्यमातुन जर पुढे येत असेल आणि आधुनिक काळाचे देणं म्हणून ते निश्चितपणे स्वागतार्ह ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज जीवनासाठी जो त्याग आणि समर्पण केले आहे, ते कोणत्याही एका समाजाला वाईट ठरवणं आणि एखाद्या समाजासाठी उत्थानाचं काम करण्यास नाही; तर, समग्र मानव समाज एका विचाराने प्रेरित होऊन तो समताधिष्ठित व्हावा, ही त्यांची या मागची बांधिलकी, निष्ठा आणि वैचारिक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान मानव म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारणं, याच्यातच आपलं शहाणपण सामावलेले आहे.

COMMENTS