सत्तांतराच्या हालचालींना वेग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तांतराच्या हालचालींना वेग

बंडखोरांना केंद्राची ‘वाय प्लस’ सुरक्षा ; राज्यपाल कोश्यारी अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई ः राज्यात गेल्या पाच दिवसांपासून बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये असून, शिंदे गट आणि भाजपच्या गोटात चर्चा सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सोनम कपूरच्या घरी आला नवा पाहुणा
उत्तर प्रदेशात काँग्रेस, बसपाला दोन अंकी संख्या गाठण्यात अपयश
आचारसंहितेचा फटका, झेडपी भरती लांबणीवर ?

मुंबई ः राज्यात गेल्या पाच दिवसांपासून बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये असून, शिंदे गट आणि भाजपच्या गोटात चर्चा सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल गुजरातमध्ये शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. यानुसार दोघांमध्ये सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी झाल्याची चर्चा असून, रविवारी फडणवीस दिल्लीला गेल्यामुळे, आणि राज्यपाल महोदय यांची हॉस्पिटलमधून राजभवनावर दाखल झाल्यामुळे राज्यात सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. इतर पक्षांकडून बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी बोलले जात असले, तरी यात भाजपची रणनीती यात समोर आलेली नाही. त्यामुळे कदाचित भाजपच्या रणनीतीतून यावर तोडगा निघून राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता बोलली जात आहे.
दरम्यान,15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्राच्या सुरक्षेत बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता असून, राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता देखील बोलली जात आहे. तर दुसरीकडे राज्यपाल कोश्यारी चार दिवसांच्या उपचारानंतर राजभवनात परतले असून, त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घडना समोर आल्या होत्या. शिवसेनेने भाजपासोबत हातमिळवणी करून नैसर्गिक युती करावी आणि राज्यात सत्ता स्थापन करावी, अशी अट बंडखोर आमदारांच्या गटाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घालण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर या सगळ्या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णय समोर आल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे 22 लोक फुटले. राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे. कितीही असू द्या. 54 असू द्या. राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझे खुले आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार, अशा शब्दांत राऊतांनी बंडखोर आमदारांच्या गटाला आव्हान दिलं आहे.
शिवसेना विधीमंडळ पक्षाने विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या माध्यमातून बंडखोरांपैकी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसला सोमवार संध्याकाळपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. पण बंडखोर आमदारांनी नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मागितली आहे. दोन अपक्ष आमदारांनी ई-मेलद्वारे विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्‍वास दाखविणारा प्रस्ताव पाठविला आहे. पण हा प्रस्ताव संबंधितांनी स्वतःच्या अकाउंटवरूनच पाठविला आहे याला पुरावा काय अस तांत्रिक मुद्दा उपस्थित करून उपाध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला आहे. शिंदे गट कायदेशीर लढाईसाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल कोरोनामुक्त होऊन राजभवनावर पोहोचले आहेत.

शिवसेनेला धक्का ; मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सांमत शनिवारपर्यंत मातोश्रीच्या जवळ होते. प्रत्येक बैठकीत ते सहभाग घेतांना दिसून येत होते. मात्र रविवारी सामंत देखील गुवाहाटीला रवाना झाल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे महाराष्ट्रातील आठवे मंत्री आहेत.

COMMENTS