नक्षलवादामुळे अनेकांचे जीवन संपुष्टात आले आहे. नक्षलवाद ही चळवळ आपल्या न्याय-हक्कांच्या मागणीसाठी सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली ह

नक्षलवादामुळे अनेकांचे जीवन संपुष्टात आले आहे. नक्षलवाद ही चळवळ आपल्या न्याय-हक्कांच्या मागणीसाठी सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. तो काळ स्वातंत्र्यानंतरचा होता. त्यामुळे त्या अनेकांची संरजामदारी वृत्ती नाहीसी झाली नव्हती. भारतीय संविधानासमोर सर्व समान आहेत, ही मानसिकता रूजली नव्हती, त्यामुळे संरजामदार, वतनदार, जमीनदारांकडून गोर-गरिबांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत होते, त्यातून नक्षलवाद जन्मास आला. मात्र आजमितीस परिस्थिती बदलली आहे. सरंजामदारी वृत्ती बर्याच प्रमाणात नाहीशी झाली आहे, कायदेशीर मार्गाने न्याय मिळवता येतो, त्यासाठी आंदोलन, मोर्चे यासारखी आयुधे वापरून न्याय मिळवता येतो, त्यामुळे तरूणांनी हातात शस्त्र घेण्याऐवजी विकासाच्या नव्या वाटेवर चालले पाहिजे, आणि ती विकासाची नवी पहाट नव्या वर्षाच्या पहिल्या वर्षात गडचिरोलीमध्ये उगवली असेच म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. 34 वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. 3 डिव्हिजन किमिटी मेंबर तर 1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी राज्य सरकारकडून 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. खरंतर ही विकासाची नवी पहाट आहे. नक्षलवादी तरूण, किंवा अनेक वर्ष या चळवळीत घातलेल्या अनेकांची मानसिकता बदलत असून, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत, यावरून नवी पहाट दिसून येत आहे. खरंतर नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे नक्षलवादाला गोळीच्या बळावर मोडीत काढण्याऐवजी आणि स्वतःचे जीवन मृत्यूच्या दारात सोडण्यासाठी या नक्षलवाद्यांनी आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची खरी गरज आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि नुकतेच 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलिस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने माओवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे नक्षलवाद्यांची कंबर तोडण्याचे काम सुरू आहे. नक्षलवाद संपुष्टात आणण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या नक्षलप्रभावित भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे निर्माण होतांना दिसून येत आहे. दळणवळणाचे साधन निर्माण होत आहे. रस्त्यांमुळे सुरक्षारक्ष, पोलिस तात्काळ पोहोचत आहेत, तसेच या वाड्या, वस्त्यांवरील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच नक्षलवादाची कंबर मोडण्यास सुरूवात झाली आहे. तसेच नक्षलवाद संपुष्टात राज्य सरकारने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. महाराष्ट्रातून नक्षलवाद कायमचा संपवण्यासाठी तेथील पोलिस स्टेशनचे बळकटीकरण करण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकार 57 कोटी 55 लाख 40 हजार रुपये खर्च करणार येत आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोलीसोबतच छत्तीसगडमध्ये देखील नक्षलवाद संपुष्टात येतांना दिसून येत आहे. छत्तीसगड राज्यात मागील वर्षभरात 287 नक्षलवाद्यांना निष्प्रभ करण्यात आले, हजार नक्षल्यांना अटक करण्यात आली आणि 837 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीला आता घरघर लागली असून, जीव गमावण्यापेक्षा आत्मसमर्पणाचा मार्ग नक्षलवादी अवलंबतांना दिसून येत आहे. आणि ती नवी पहाट दिसून येत आहे. त्यातून या नक्षलप्रभावित भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्यास मदत होणार आहे.
COMMENTS