Homeताज्या बातम्यासंपादकीय

विषवृल्लीला पोसणारे कोण ?

भारतासारख्या देशात विविध जाती-धर्माचे, पंथांचे लोक एकत्र आणि गुण्या गोविंदाने नांदतांना दिसून येते. विविधतेतून एकता भारतात नांदते असे नेहमीच म्हट

एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह
चांद्रयानमुळे अवकाश खुले
लग्नाळूंचा मोर्चा आणि वास्तव

भारतासारख्या देशात विविध जाती-धर्माचे, पंथांचे लोक एकत्र आणि गुण्या गोविंदाने नांदतांना दिसून येते. विविधतेतून एकता भारतात नांदते असे नेहमीच म्हटले जाते. मात्र अलीकडच्या काही दशकांपासून भारतासारख्या देशांतील तरूणांची माथी भडकावण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे, आणि त्यातून अनेक संघटनाचा उदय झालेला दिसून येत आहे. मात्र या कू्ररकर्म्यांची अखेर मात्र वाईटच झालेली दिसून येते. तब्बल 36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपालसिंगला रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. पोलिस म्हणतात अटक केली तर, अमृतपालसिंग म्हणतो आत्मसमर्पण केले. मात्र शेवटी त्याला पोलिसांना शरण यावेच लागले. ’वारीस पंजाब दे’ या संघटनेच्या माध्यमातून त्याने मोठ्य प्रमाणावर संघटन निर्माण केले होते.

या संघटनेचे संघटन विधायक चळवळीसाठी निर्माण केले नव्हते तर, यातून नवा दबाव गट आणि त्यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता. स्वतंत्र खलिस्तानाची मागणी पंजाबमध्ये जोर धरत असून, त्याला खतपाणी घालण्याचे काम अमृतपालसिंग करत होता. त्यासाठी पाकिस्तान, त्या देशाची दहशतवादी संघटना आयएसआयही संघटना अर्थपुरवठा आणि शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अमृतपालसिंग आपल्या सहकार्‍यांना बंदुक चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे अमृतपालसिंग या एक सशस्त्र चळवळ उभी करू पाहत होता, हेच यातून दिसून येते. मात्र कोणताही व्यक्ती काही एका दिवसात मोठा होत नाही. त्याला पोसणारे अनेक जण होते.

त्यामध्ये प्रामुख्याने पंजाबमधील अनेक स्थानिक नागरिकांचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाचा यामागे सर्वात मोठा दोष आहे. अमृतपालसिंगच्या कारवायांचा पोलिसांना जाणीव नसेल, असे नाही. पोलिसांकडे सर्वांची कुंडली असते. त्याचबरोबर अमृतपालसिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र बाळगतो, सहकार्‍यांना बंदुक चालवण्याचे प्रशिक्षण देतो, आणि त्याचबरोबर त्याला विदेशातून मोठ्या प्रमाणावर अर्थपुरवठा होतो, पाकिस्तानी दहशतवादी संघटना त्याची मदत करतात याची साधी भणकही पोलिसांनी असू नये याचे आश्‍चर्य आहे. जर पोलिसांना यासंदर्भातील माहिती होती, तर पोलिसांनी त्याचे एवढे मोठे प्रस्थ निर्माण होण्याआधीच ते मोडीत का काढले नाही, हा महत्वाचा प्रश्‍न आहे.

अमृतपालला दिबु्रगड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या तुरुंगात त्याचे 9 साथीदार आधीपासूनच जेरबंद आहे. आयबी, रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) व इतर केंद्रीय तपास संस्थांची टीम अमृतपालची चौकशी करण्यासाठी दिब्रुगड तुरुंगात जाणार असून, त्याची फंडिंगविषयी चौकशी करण्यात येणार आहे. अमृतपालवर देशद्रोहासह 16 गुन्हे दाखल आहेत. एनएसए लावला आहे. अमृतपाल व त्याच्या साथीदारांना पंजाबपासून दूर तुरुंगात पाठवण्यामागे सुरक्षा संस्थांना खलिस्तानी कटाचे इनपुट वारंवार मिळणे हे कारण मानले जाते. पंजाबमध्ये शांतता नांदावी त्यामुळे आरोपींना बाहेरच्या तुरुंगात पाठवण्याचा निर्णय झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करत विविध कलमे लावली आहेत. त्यामुळे रासुका कायद्यान्वये त्याला गुन्हा दाखल झाल्यामुळे एक वर्ष तुरुंगात राहावे लागू शकते.

रासुका कायद्याने केलेली अटक म्हणजे ही प्रतिबंधात्मक अटक म्हणजे प्रतिबंधात्मक ताबा आहे. याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यासाठी नव्हे, तर गुन्ह्याच्या संशयाने अटक करून तुरुंगात ठेवले जाते. याची खातरजमा जिल्हाधिकार्‍यांना करावी लागते. किंबहुना ते अनेक अहवाल सादर करत असतात. याआधारे सिद्ध होते की, या व्यक्तीने तुरुंगात राहणे किती आवश्यक आहे, अन्यथा तो गंभीर गुन्हा करू शकतो. त्यामुळे समाज आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. एकूणच, हा कायदा सरकारला गुन्हा घडण्यापूर्वी कोणत्याही संशयिताला अटक करण्याचा अधिकार देतो. इंदिरा गांधी सरकारने 1980 मध्ये हा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्यामुळे अमृतपालसिंगला आता अनेक वर्षे तुरुगांत काढावी लागू शकतात. 

COMMENTS