Homeताज्या बातम्यासंपादकीय

शेतकर्‍यांवर संकटांचा डोंगर

शेतकर्‍यांची आजमितीस अतिशय दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती. यंदा पावसाचे आगमन

विकासाचा ‘समृद्धी’ महामार्ग
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह
अवकाळीचा तडाखा

शेतकर्‍यांची आजमितीस अतिशय दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती. यंदा पावसाचे आगमन लांबल्यामुळे पिकं घेण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम तरी साधता येईल अशी शेतकर्‍यांची इच्छा होती, मात्र निसर्गाने रब्बी हंगाम देखील उधळून लावला आहे. पांढरं सोनं म्हटलं जात असलेला कापूस यंदा पावसात सापडल्यामुळे कापूस पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. यासोबतच सोयाबीनमुळे पदरी निराशा पडली, तर युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला बे्रक मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप आणि रब्बी हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढतांना दिसून येत आहे. त्याशिवाय आज ही परिस्थिती आहे, तर ऐन उन्हाळ्यात हेच चित्र अतिशय दाहक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरंतर सत्ताधार्‍यांनी शेतीधोरणात आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांचे जीवनमान, कौटूंबिक जीवन, कौटूंबिक आर्थिक स्तर, शेती प्रकार, कौरडवाहू, अर्धबागायती, घरातील खर्च, वाढत्या महागाईचा शेती भांडवलावर होणारा बोझा आजारपाजारांवर वाढते खर्च, शेतकर्‍यांच्या कुटूंबातील पिढ्यानपिढ्यांचे दारिद्रय, कुटूंबात बेरोजगार मुलं, अडचणी अभावी शाळेपासून उच्च शिक्षणापासून, योग्य दिशा, मार्गदर्शनाच्या अभावाने दुरावलेले मुलं, पाल्य शेतीला जोडधंद्यांचा, प्रक्रीया उद्योगांचा अभाव, उत्पादनाधारित नसलेली कर्जव्यवस्था, नैसर्गिक आपत्तीत पिक नुकसानीचे वाढते प्रमाण विजेचे वाढते दर, अशा अनेक प्रश्‍नांच्या गुंत्यात अडकलेला शेतकरी वर्ग जो मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा कोरडवाहू क्षेत्रात आहे. त्याचे प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. शेतकरी आत्महत्यांवर अनेक तज्ज्ञ, विद्वानांची अनेक वेळा चर्चा केल्या. माध्यमांनी सातत्याने लिहिले, दाखवले मात्र शेतकरी आत्महत्येचं मूळ शोधण्यात कुठेतरी राहून गेलं? याची सल आहे. बदलत्या काळात विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीत कुठेतरी कोरडवाही शेतकरी विकासाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न खुजे पडताहेत. दोष मात्र दिला जातो, ज्याने शेतीचा बांधही पाहिला नाही, कधी नांगर हाकला नाही. असा तज्ञवर्ग जेव्हा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांबाबत नको ते बरळतो तेव्हा कुठेतरी शेतकरी दुखावला जातो. अनेक समित्यांनी अनेक अहवाल दिलेत, काहींनी शेतकर्‍यांना दोषच दिला. पी. साईनाथांनी केलेला अहवाल मात्र सरकारने आत्मसात का केला नाही? हाच प्रश्‍न सतावतो आहे. शेतात राबणारा, मातीतून पिकलेलं बाजारात मातीमोल विकणारा शेतकरी समजून घेण्यापेक्षा त्यांच्यात दोष शोधण्याचे काम अनेकांनी केलं. म्हणतात ना, ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’ हे असं आहे जे जाणायला मन लागतं तेही संवेदनशील म्हणतात ना, जावा त्यांच्या गावां, हे सगळं जाणून घेण्यापेक्षा स्वतःला शेतकर्‍यांची पोरं समजून सत्तेत मशगुल मोठमोठ्या पदांवर, विद्यापीठांत पदव्या मिळवून ‘सगळं काही आम्हाला ठाव’ म्हणणारी मंडळी खूप झाली. शेतीपुढील मुळ प्रश्‍न, अडचणी, शेतकर्‍यांचे कौटूंबिक, आर्थिक जीवन, निसर्गावर आधारित शेतील, शेतकर्‍याला पाण्यात पाहणार्‍या कर्ज देणार्‍या बँका, संस्था, सरकारी योजना व कृषी सवलतीपासून गरीब गरजू शेतकर्‍यांची होणारी विवंचना, शेतकर्‍यांसाठी माहिती मार्गदर्शन केंद्राचा अभाव, गावातील शिकलेल्या मुलांची शहराकडे असणारी ओढ, गावाकडे शिकलेल्यांचे दुर्लक्ष, तज्ज्ञांचे कागदी आराखडे, भाषणे हे सर्व शेतातील मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात पेरायला मात्र कोणी त्याग करायला तयार नाही. जोपर्यंत गावाकडे शिक्षण, रोजगार, मार्गदर्शन, कर्जाचे समान वितरण, होणार नाही तोपर्यंत या बाजारबुणग्या परिस्थितून शेतकरी बाहेर येईल कसा? शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयावर बोलतांना, लिहीतांना यातनेसोबत गाठ असावी लागते, शेतकरी उभा राहील पण त्यांची थट्टा थांबायला हवी, पिढ्यानपिढ्या ज्या शेतकर्‍यांनी एकुण सर्व समाजाला अन्न दिले तो राबराब राबला म्हणून आपल्या ताटात मिष्ठान्न नांदले याचे भान जोपर्यंत मानवाला येत नाही, जोपर्यंत जेवणाच्या ताटात कष्टणारा, राबणारा शेतकरी दिसत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवणेसाठीच्या उपाययोजनांना उकल होणार नाही. 

COMMENTS