स्पर्धेच्या आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्या आहेत. त्यातच प्रचंड मेहनत करून आपण यश मिळवून आणू शकतो, हा विश्वास देखील याच प
स्पर्धेच्या आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्या आहेत. त्यातच प्रचंड मेहनत करून आपण यश मिळवून आणू शकतो, हा विश्वास देखील याच परीक्षांनी सर्वसामान्य घरांतील विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी कोणत्याही सोयी-सुविधा नसतांना रात्रंदिवस परीक्षेचा अभ्यास करतात आणि यश मिळवतात. मात्र आता या यशाला देखील नजर लागतांना दिसून येत आहे. कारण या परीक्षेमध्ये होणारे घोळ. नीट परीक्षातील जे घोळ बाहेर येत ते बघितल्यानंतर यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. डॉक्टर बनण्यासाठी ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची पूर्वअट. या परीक्षेच्या गुणांच्या आधारावरच मेडिकलसाठी नंबर लागतो. मात्र या परीक्षेत देखील लाखोंची उलाढाल होत असल्याचे गंभीर आरोप होत असल्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू आहे. खरंतर नीट परीक्षा टफ परीक्षा म्हणून ओळखले जाते. असे असतांना देखील या विषयांच्या तज्ज्ञांना देखील काही प्रश्नांची उत्तरे येत नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. मग असे असतांना तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळतील हा मोठा यक्षप्रश्न आहे. खरंतर परीक्षा देणारे विद्यार्थी बारावीतील आहेत. त्यामुळे त्यांची एका विषयावर देखील पकड असण्याची शक्यता कमी आहे. असे असतांना 67 विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवतात, याचाच अर्थ यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसून येते. देशमभरात 5 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे अर्थात एनटीएद्वारे घेण्यात आली. या परीक्षेसाठी विद्यार्थी कित्येक वर्षांपासून तयारी करतात, तर हजारो विद्यार्थी महागडे क्लासेस लावून या परीक्षेचा अभ्यास करत असतात. कारण त्यांचे ध्येय मेडिकल क्षेत्रात करिअर करणे असते. पंरतु या परीक्षेचा 4 जून रोजी निकाल जाहीर झाला आणि एकच धांदल उडाली. विशेष म्हणजे हा निकाल 14 जून रोजी जाहीर होणार होता, मात्र तो 10 दिवस आधीच जाहीर करण्यात आला. तसेच या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. तर दुसरीकडे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचची ऑल इंडिया रँक प्रगत, तर जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची रँक पाठीमागे. यानंतर सुरू झाला या परीक्षेतील निकालावर प्रश्नचिन्ह. आणि जस-जसे या निकालामध्ये डोकावले, तसे-तसे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात हितेश सिंग कश्यप यांनी सीबीआय तपासासाठी याचिका दाखल केली होती. कर्नाटक, ओडिशा, झारखंड आदी राज्यांतील विद्यार्थ्यांनी गुजरातमधील गोध्रा येथील जय जल राम परीक्षा केंद्र निवडण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर या परीक्षा केंद्रावर ड्युटी देणार्या शिक्षकासह 5 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या शिक्षकाकडून त्या सर्व 26 विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे. यासोबचत एनटीए विद्यार्थ्यांना गैरमार्गाने वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. याासेबतच तब्बल 1 हजार 563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क अर्थात वाढीव मार्क देण्यात आले. तसेच परिक्षेत 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेत. गेल्या वर्षी देशभरातून फक्त दोनच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते. त्यामुळे यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून, न्यायालयाने वाढीव मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. किंवा वाढीव गुण रद्द करण्याचा मार्ग त्यांच्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे 1 हजार 563 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा एनटीएला काहीच अधिकार नाही. कारण या विद्यार्थ्यांना वाढीव गुण का देण्यात आले, त्यासाठी काही अर्थपूर्ण देवाण-घेवाण तर झाली नाही, ना, असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
COMMENTS