दीपक पोकळेवर कठोर कारवाईची डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मागणी राहाता : शिर्डी येथील सचिन गिधे या तरुणाच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येप्रकरणामुळे संपूर

दीपक पोकळेवर कठोर कारवाईची डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मागणी
राहाता : शिर्डी येथील सचिन गिधे या तरुणाच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येप्रकरणामुळे संपूर्ण राहाता–शिर्डी परिसर हादरून गेला आहे. मोक्क्यातील सराईत गुन्हेगार दीपक पोकळे याने ही हत्या केल्याचा आरोप असून, त्याच्यावर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी मराठवाड्यातील भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी आमदार सुरेश धस यांनी भेट दिली. यावेळी त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप, मदनलाल पिपाडा, नरेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, निखील पिपाडा, योगेश मुनावत, चेतन पिपाडा, रामदास येवले आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दीपक पोकळे हा गेल्या १५ वर्षांपासून राहाता, शिर्डी, कोपरगाव व संगमनेर तालुक्यांत दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, हप्ते वसुली, आर्म अॅक्ट, मोक्का आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१४ साली राहाता येथे एका युवकाच्या खुनाचा गुन्हा, २०२५ मध्ये संगमनेर तालुक्यात जीवघेणा हल्ला केल्याची नोंद असल्याचे निवेदनात नमूद आहे. संगमनेर येथील हल्ल्यानंतर वेळेत अटक झाली असती, तर शिर्डीतील तरुणाचा जीव वाचला असता, असा आरोपही करण्यात आला आहे.
१० डिसेंबर रोजी शिर्डी येथून सचिन गिधे यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला. पोकळे याने आतापर्यंत अनेक वाहनचालक, भाविक व व्यावसायिकांना लुटल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच राजकीय पाठबळामुळे आपणास कोणीही रोखू शकत नाही, अशा समजुतीतून त्याचे धाडस वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे शिर्डी मतदारसंघातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, आरोपी दीपक अंबादास पोकळे याला कठोर शिक्षा करून मृत तरुणाच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS