Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणसाने विनोदी असणं हे जिवंत पणाचे लक्षण; डॉ मिर्झा रफी अहमद बेग

पाथर्डी प्रतिनिधी - इंग्रजीचा बाज वेगळा असला तरी आपली मातृभाषा मराठी आहे व आपण तिचा आदर केला पाहिजे. विनोद ऐकण्यासाठी व समजण्यासाठी वेगळा पेश

आई राजा उदे उदेच्या गजराने राशीन, कुळधरण दुमदुमले !
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई ;६० लाखांची रोकड केली हस्तगत
करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका

पाथर्डी प्रतिनिधी – इंग्रजीचा बाज वेगळा असला तरी आपली मातृभाषा मराठी आहे व आपण तिचा आदर केला पाहिजे. विनोद ऐकण्यासाठी व समजण्यासाठी वेगळा पेशन्स लागतो. माणसाने विनोदी असणे हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असून दुर्दैवाने विनोदाला मराठी साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही अशी खंत झी टी व्ही हास्यसम्राट उपविजेते डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांनी व्यक्त केली. 

ते बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय बाबुजी आव्हाड स्मृती व्याख्यानमाला उद्घाटन प्रसंगी ‘विनोद आणि कविता’ या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, विश्वस्त नंदुकुमार शेळके, डॉ. शंकर चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी. पी. ढाकणे, विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे, सामाजिक कार्यकर्ते वैभव शेवाळे, नारायणबापू धस, शाहीर भारत गाडेकर आदी उपस्थित होते. 

डॉ मिर्झा बेग म्हणाले, सध्या भारतातील लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल आकर्षण राहिले नसून सर्वजण जागतिक उदात्तीकरणाच्या विश्वात रममाण आहेत. मराठी भाषा इंग्रजीच्या छायेखाली दबली असून कुटुंबातील प्रत्येकाला आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकावा अशी इच्छा असते.धर्मामुळे माणूस हिंदू झाला, मुस्लीम झाला, बौद्ध झाला, परंतु माणूस झाला नाही हे आजचे खरे दुर्दैव आहे.महाराष्ट्रात मराठीच्या विविध बोलीभाषा अस्तित्वात असून प्रत्येक बोलीभाषा आपल्या विनोदी अंगाने फुलत असते. मराठी भाषेचे उदात्तीकरण करणे,आपल्या व्यवहारात इंग्रजी भाषा सीमित ठेवणे व मोबाईलचा वापर कमी करणे या तीन अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

त्यांचा व त्यांच्या कवितेचा ५० वर्षाचा प्रवास त्यांनी खुसखुशीत शैलीत वर्णन केला. राजकीय पक्ष, राजकारण, देश, इंग्रजीचा अतिरेक, शेतकऱ्यांची आजची अवस्था, खाजगीकरण, कुटुंबव्यवस्था आदी विषयावर त्यांनी आपल्या तिरकस शैलीतून हास्य पिकवत प्रबोधन केले. वऱ्हाडी भाषेतील विनोदी काव्य आणि त्यात असलेल्या नर्म विनोदाने विद्यार्थ्यांना पोट धरून हसायला लावले तसेच अंतर्मुखही करायला लावले. शेतकऱ्यांचे दुःख त्यांनी विनोदातून सहजपणे मांडले. ऑनलाईन ऑर्डरच्या विनोदाने त्यांनी आपल्या हास्य एक्सप्रेसला सुरुवात केली, ‘जो करतो शेती त्याच्या हातात माती’, ‘मुसलमान असूनही मला येते मराठी’, ‘थ्या रोजी तुम्ही.. माह्या घरी येते झाले’, ‘ढेकर देत गेले.. इंग्रज इथे जेवून’, ‘मराठीचा अभिमान मले.. भारताचा गर्व’ या हास्यकोटींवर विद्यार्थ्यामध्ये हशा पिकला. वाघही माणसाच्या वाटेला जात नाही हे सांगताना ‘अशा जहरी माणसाची शिकार कोण करते, वाघ असलो तरी गवत खाने पुरते….या कवितेतून माणसांच्या प्रकारावर तिरकस टीका केली. डॉ. मिर्झा बेग यांची मिर्झा एक्सप्रेस दीड तास निनादत राहिली.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते वैभव शेवाळे, शाहीर भारत गाडेकर, हुमायून आतार, बाळासाहेब खेडकर व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार व्याख्यानमाला समन्वयक डॉ. अशोक कानडे यांनी मानले.

COMMENTS