Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला

एएचटीयूची धडक कारवाई, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील आम्ला (ता. गेवराई, जि. बीड) येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा

तलवाडा गाव तलाव संरक्षण प्रकरण: तिसरी नोटीस देण्यात विलंब, आंदोलनकर्‍यांचा रोष
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे; गेवराईतील आश्रम शाळेत ‘आनंद नगरी’ उत्साहात
तलवाडा शाळेत दहावी-बारावी निरोप सोहळा

एएचटीयूची धडक कारवाई, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गेवराई । प्रतिनिधी
तालुक्यातील आम्ला (ता. गेवराई, जि. बीड) येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर बालविवाह झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष एएचटीयू बीडच्या पथकाने वेळेत हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी आम्ला गावात एका 14 वर्षांच्या मुलीचा बालविवाह करण्यात आला असून, त्या विवाहानंतर आज संबंधित घरात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. माहितीची खातरजमा करून पीएसआय पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली एएचटीयूचे पथक तात्काळ आम्ला गावात दाखल झाले.
पथकाने दिलेल्या पत्त्यावर छापा टाकला असता पोलीस आल्याचे लक्षात येताच उपस्थित पाहुणे आणि नातेवाईक सैरावैरा पळून गेले. पीडित मुलीला घरात अथवा अन्यत्र लपवून ठेवण्यात आले होते. घरातील सदस्यांनी ‘येथे कोणताही विवाह झालेला नाही’ असा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पीएसआय पल्लवी जाधव यांनी घरात व परिसरात सखोल शोध घेतला; मात्र सुरुवातीला मुलगी मिळून आली नाही. दरम्यान, विवाह झालेला पुरुष पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विवाह झाल्याचे नाकारले व आपण तो व्यक्तीच नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पीएसआय पल्लवी जाधव यांनी विवाह झाल्याचे छायाचित्र व इतर पुरावे आपल्या जवळ असल्याचे स्पष्ट करताच संबंधित व्यक्ती गोंधळून गेला व अखेर त्याने बालविवाह झाल्याची कबुली दिली. त्याने आपले नाव कृष्णा उर्फ बबन अनुरुद्ध वरबडे (वय 30 वर्षे, रा. आम्ला, ता. गेवराई, जि. बीड) असे सांगितले. तसेच पीडित मुलगी ही आपल्या मामाची मुलगी असल्याचेही त्याने कबूल केले. सुमारे एक तासानंतर पीडित मुलीला पोलिसांसमोर हजर करण्यात आले. ती अत्यंत घाबरलेली व मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येत होते. पीएसआय पल्लवी जाधव यांनी तिला जवळ घेऊन विश्वासात घेतले, तिची सविस्तर विचारपूस केली व समुपदेशन करून तिला मानसिक आधार दिला. यानंतर गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना घटनास्थळी बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. उपस्थित नातेवाईक व गावातील नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, त्यातील शिक्षेच्या तरतुदी तसेच बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्य, शिक्षण, मानसिक विकास व भविष्यातील आयुष्यावर होणार्‍या गंभीर दुष्परिणामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. पीडित मुलगी, बालविवाह करणारा कृष्णा उर्फ बबन वरबडे तसेच त्याचे आई-वडील यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तलवाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पीडित मुलीच्या आई-वडिलांनाही फोनद्वारे पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. ग्रामसेवकांना बालविवाह झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महिला पोलीस अंमलदारांना पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांसह बालकल्याण समितीसमोर हजर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे व पोलीस शिपाई योगेश निर्धार (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, बीड) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS