भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये 18 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी 102 जागेसाठी मतदान घेण्यात आले. या लोकशाहीच्या उत्सवासाठी म

भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये 18 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी 102 जागेसाठी मतदान घेण्यात आले. या लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदारांमध्ये असलेला उत्साह वाखाण्याजोगा होता. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून महायुती, तसेच महाविकास आघाडीमधून जोरदार दंड, बैठका काढण्यात येत होत्या. एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप, सुरू होते. मात्र शुक्रवारी प्रथम टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. मणिूपर राज्यातील किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण देशभरात मतदान शांततेत पार पडले. देशातील 102 तर महाराष्ट्रातील 5 जागांचा यामध्ये समावेश होता. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यामुळे तरूणांचा उत्सव अधिकच होता. देशामध्ये उन्हाचे चटके बसत असतांना देखील, मतदानांसाठी घराबाहेर पडणार्यांचा उत्साह दिसून येत होता. त्यामुळे 102 खासदारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. त्याचा फैसला आता 4 जून रोजीच लागणार आहे. मात्र यानिमित्ताने महाराष्ट्रातील 5 खासदारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या 5 ही जागा विदर्भातील असून, यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. खरंतर लोकशाहीच्या या उत्सवामध्ये कोण खासदार होणार आणि कोण पराभूत होणार याचा फैसला सर्वसामान्य मतदार करणार आहे.
कारण या देशामध्ये सर्वांच्या मतांना समान मूल्य आहे. त्यामुळे उद्योगपतीच्या मताला जी किंमत आहे, तीच किंमत झोपडीत राहणार्या व्यक्तीच्या मताची आहे. त्यामुळे या मताचा वापर योग्य पद्धतीने करण्याची खरी गरज आहे. भारतासारख्या विशाल देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे मोठे आव्हान होते. कारण भारत हा विविध जाती आणि धर्मामध्ये विखुरलेला होता. अशावेळी या देशाला एकत्र ठेवण्यासाठी त्यावेळी संविधान सभेमध्ये मोठा खल झाला, त्यानंतरच भारतीय संविधान अस्तित्वात आले. खरंतर आपण इंग्रजाविरूद्ध जो लढा उभारला होता, जे स्वातंत्र्ययुद्ध आपण लढले ते स्वातंत्र्यासाठी होते, ते लोकशाहीसाठी नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्यासोबतच आपल्याला लोकशाहीचा वसा किंवा वारसा फुकट मिळालेला आहे. त्यामुळे या लोकशाहीची ताकद किती असते, याची किंमत किती आहे, याची समज आपल्यातील अनेकांना अजूनही आलेली नाही. त्यामुळे ही समज वाढवण्याची खरी गरज आहे. भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा कायदेशीर हक्क आपण बजावलाच पाहिजे. मतदानाच्या दिवशी आपणास सुट्टी दिली जाते, मात्र आपण सुट्टी घेऊन त्यादिवशी ऍन्जाय करण्याचा प्रयत्न करतो, आणि मतदानाला दांडी मारतो, या बाबी चुकीच्या आहेत.
त्यामुळे लोकशाहीचे आणि मतदानाचे मूल्य सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याची खरी गरज आहे. तरच लोकशाहीचा चांगल्यापद्धतीने विकास होवू शकतो. अन्यथा राजकीय नेते लोकशाहीला जसे पाहिजे तसे घेऊन जातील आणि आपण डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्या पाठीमागे चालत राहू. त्यामुळे डोळसपणे प्रश्न विचारता आले पाहिजे. भारतात आम्ही लोक सर्वश्रेष्ठ आहे, तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये संसद सर्वश्रेष्ठ आहे, हा भेद आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे संविधानानुसार देशातील सर्व ताकद जनतेच्या हाती निहित आहे. मात्र खरंच ही ताकद तुमच्या हातात आहे का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता आम्ही लोक जरी सर्वश्रेष्ठ असलो आमच्या हातात देशाची ताकद निहीत असली तरी, तिचा वापर आपण लोकशाहीसाठी करत नाही. कारण लोकशाहीची मूल्ये आपल्यात अजूनही रूजलेली नाहीत. ती लोकशाहीची मूल्ये जेव्हा आपल्यात रूजेल तेव्हाच आपण सक्षम, चारित्र्यवान, उमेदवार निवडून देऊ. त्यामुळे लोकशाही मूल्यांची समज वाढवण्यासाठी भारतीय संविधान चांगल्याप्रकारे समजावून घ्यावे लागणार आहे. त्यातून लोकशाही म्हणजे काय, लोकशाही कशा पद्धतीने सत्तेचे गणित बदलू शकते, याचे आत्मभान येण्याची खरी गरज आहे.
COMMENTS