मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प सोडला असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी ‘निक्षय
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प सोडला असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी ‘निक्षय मित्र’ योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या योजनेला तब्बल 11 हजार 777 मुंबईकरांनी प्रतिसाद दिला असून या ‘निक्षय मित्रां’नी 19 हजार 818 क्षय रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ‘निक्षय मित्रां’नी रुग्णांसाठी पोषण आहाराची सुमारे 88 हजार 89 पाकिटे उपलब्ध केली आहेत.
मुंबईमध्ये 50 हजारांहून अधिक क्षयरोग रुग्णांवर उपचार सुरू आहेत. क्षयरोगाशी लढा देण्यासाठी प्राथमिक टप्प्यामध्ये पोषण आहार महत्त्वाचा आहे. त्यासाठी ‘निक्षय मित्रां’नी पुढाकार घेतला आहे. ‘निक्षय मित्रां’कडून रुग्णांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत रेशन किट उपलब्ध करण्यात येते. प्रभागस्तरावर वैद्यकीय अधिकारी नागरिकांना ‘निक्षय मित्र’ होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत ‘निक्षय मित्रां’च्या यादीत 11 हजार 777 मुंबईकरांचा समावेश झाला असून, त्यांनी 19 हजार 818 रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांचा समावेश असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. ज्या नागरिकांना ‘निक्षय मित्र’ व्हायचे आहे, त्यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा त्यांना संकेतस्थळावरूनही नोंदणी करता येते. त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी दात्यांशी फोनवर संपर्क साधतात आणि संबंधितांना या योजनेची माहिती देतात. तसेच ते किती रुग्णांना दत्तक घेणार याबाबतही विचारणा करतात. रुग्णांना देण्यात येणारा पोषण आहारा हा दात्याच्या दानावर अवलंबून असतो. रेशन किटची किंमत साधारणपणे 500 ते 900 रुपये प्रति महिना आहे. यामध्ये गहू, तांदुळ, डाळ, तेल, गुळ आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असतो. क्षयरोग झालेली व्यक्तीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच या आजाराचा सामना करावा लागतो. क्षयरुग्णांवर एक ते दोन वर्षे उपचार करावे लागतात.
COMMENTS