सत्ताधारी चांगल्या कारभाराचा कांगावा करतात. मग सभासदांच्या ऊसाला उच्चांकी दर का मिळत नाही.
कराड / प्रतिनिधी : सत्ताधारी चांगल्या कारभाराचा कांगावा करतात. मग सभासदांच्या ऊसाला उच्चांकी दर का मिळत नाही. असा टोला देत यशवंतराव मोहिते रयत पॅनेल सत्तेत आल्यानंतर सभासद केंद्रस्थानी ठेवून कारभार केला जाणार आहे. सभासद हा कृष्णेचा मालक आहे. त्यांची मालकी अबाधित ठेवून प्रगतीचे अनेक टप्पे गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील. सभासदांनी अमिषे, भूलथापांना बळी न पडता रयत पॅनेलच्या पाठिशी ठाम रहावे. ऊसाला उच्चांकी दर, वेळेवर ऊसतोड, कामगारांच्या कामाची दखल घेवून त्यांना न्याय व विविध प्रकल्प राबविण्याचा आमचा मानस आहे. सभासद व कामगार हितासाठी रयत पॅनेल प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केले.
त्यांनी नेर्ले-तांबवे गटातील प्रचारा दरम्यान बेलवडे बु।, कालवडे, मालखेड, कासारशिरंबे, वाठार येथे रयत पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी डॉ. मोहिते यांनी सभासदांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून रयत पॅनेलची भूमिका जाहीरनामा देत स्पष्ट केली. त्यांच्यासमवेत उमेदवार प्रशांत पाटील, गणेश पाटील, मनोहरसिंह थोरात, डॉ. शंकरराव रणदिवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, मागील काळात सभासद हित नजरेआड ठेवून कारभार झाला आहे. ऊसतोड ते पाण्यापर्यंत राजकारण करत सभासदांच्या आर्थिक उन्नतीला खीळ बसली आहे. साखर निर्मितीबरोबर ऊस दर वाढवण्यासाठी सह उत्पादने वाढवण्याचा प्रयत्न न झाल्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊसदर देण्यात कृष्णा कारखाना मागे पडला आहे.
ते म्हणाले, एकाधिकारशाही राबवून सभासद व कामगारांच्या स्वप्नांना सुरुंग लावला जात आहे. मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्स्फर, ऊस तोड, कामगारांची पदोन्नती व त्यांना कामाप्रमाणे मेहनताना मिळत नाही. जलसिंचन योजना नीट चालत नाहीत. सत्ताधारी चांगल्या कारभाराचा कांगावा करतात. मग सभासदांच्या ऊसाला उच्चांकी दर का मिळत नाही, असा माझा सवाल आहे.
ते म्हणाले, रयत पॅनेलची भूमिका सभासदांना बरोबर घेवून त्यांची सर्वांगीण प्रगती साधण्याची आहे. रयत पॅनेलचा जाहीरनामा सभासदांनी नीट समजावून घेतल्यास आमची भूमिका सभासद हित जोपासणारी असल्याचे आपणास जाणवेल.
COMMENTS