मुंबई : मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहात जर सिनेमा किंवा नाटक बघायचे असेल तर त्याचे दर महागण्याची शक्यता आहे. कारण चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस,
मुंबई : मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहात जर सिनेमा किंवा नाटक बघायचे असेल तर त्याचे दर महागण्याची शक्यता आहे. कारण चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग व खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या 13 वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती. 2024-25 या वर्षासाठीच हे नवीन कर प्रस्तावित करण्यात आले असून राज्य सरकारने मंजुरी दिल्यावर हे कर लागू होणार आहेत.
चित्रपट, नाटक, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग व खेळ यांच्यावर रंगभूमी कर आकारण्याचे अधिकार मुंबई महापालिकेला आहेत. मराठी व गुजराती नाटके, चित्रपट, एकपात्री नाट्यप्रयोग, तमाशा यांना या रंगभूमीकराच्या अधिदानातून माफीची सवलत असते. 2010 मधील दरानुसार सध्या हे कर आकारले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळामागे 50 ते 60 रुपये आकारले जात आहेत. या कराच्या दरात दरवर्षी 10 टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव महासभेत 2015 मध्ये मंजूर झाला होता. मात्र त्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिली नसल्यामुळे जुनेच दर आकारले जात आहे. मात्र त्यात आता वाढ करण्याचा निर्णय करनिर्धारण व संकलक विभागाने घेतला आहे. ही करवाढ लागू झाल्यास पालिकेला वार्षिक 10 कोटींचा महसूल मिळणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. आतापर्यंत वातानुकूलित चित्रपटगृहांसाठी सरसकट प्रत्येत खेळासाठी 60 रुपये कर आकारला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या ‘मल्टीप्लेक्स’ चित्रपटगृहांमध्ये एकाच इमारतीत 1 ते 8 पडदे असतात. त्यांची आसन क्षमता 50 ते 250 इतकी असून तिकीट दर 200 ते 1550 च्या दरम्यान असते. त्यामुळे या मल्टीप्लेक्सवरील करमणूक करांत वाढ करण्याचे पालिकेने ठरवले आहे.
COMMENTS