हनुमानाच्या जन्मस्थळांचा वाद जुनाच ; पाच ठिकाणी जन्म झाल्याच्या पुराणकथा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनुमानाच्या जन्मस्थळांचा वाद जुनाच ; पाच ठिकाणी जन्म झाल्याच्या पुराणकथा

रामाचा पट्टशिष्य असलेल्या आणि युवकांना शरीर सामर्थ्याची दीक्षा देणार्‍या बजरंगबली हनुमानाच्या जन्मस्थळावरून आता आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात वाद सुरू असला, तरी देशात अन्य तीन ठिकाणेही हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात.

बेलापूर महाविद्यालयात चित्रपट निर्मिती कार्यशाळा उत्साहात
पोलिसांवर संक्रांत…एकाला मारहाण, एकाच्या खुनाचा प्रयत्न
मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार

मुंबई/प्रतिनिधीः रामाचा पट्टशिष्य असलेल्या आणि युवकांना शरीर सामर्थ्याची दीक्षा देणार्‍या बजरंगबली हनुमानाच्या जन्मस्थळावरून आता आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात वाद सुरू असला, तरी देशात अन्य तीन ठिकाणेही हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. त्याचे पौराणिक संदर्भ दिले जातात; परंतु पुराव्यानिशी हेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे, हे कोणीच सांगू शकलेले नाही. त्यामुळे हा वादही चिरंतन आहे. 

आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आता हनुमानजींच्या जन्मस्थळावरून वाद सुरू झाला आहे. नेमके जन्मस्थळ कोणते, हे ठरवण्यासाठी आता समिती नेमली आहे. आपल्याकडे महनीय व्यक्तींच्या जन्मतिथी, जन्मस्थळावरून वाद कायमच पेटते राहतात. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद गेल्या दोन वर्षांपूर्वीच गाजला होता. आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद आहे. विकीपिडायाचा आधार घेतला, तर नाशिकपासून वीस किलोमीटर असलेल्या अंजनेरी गडावर हनुमानाचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. जटायूचा वध, गोदावरीच्या काठाने दंडकारण्यातून रामाचा झालेला प्रवास, रामायणातील अनेक प्रसंग पाहिले, तरी लोक खात्रीने हनुमानाचा जन्म अंजनेरीवर झाला, असे सांगतात. अंजनेरी डोंगरावर माता अंजनीचे मंदिर आहे आणि त्याहून अधिक उंचीवर हनुमानाचे मंदिर आहे. हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे.

काही विद्वानांचे असे मत आहे, की हनुमानाचा जन्म झारखंडमधील गुमला नावाच्या जिल्ह्या पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनगाव येथील एका गुफेत झाला. त्यामुळे या गावाचं नाव अंजनगाव(धाम) असे ठेवले. माता अंजनी यांचे निवास असल्यामुळे याचे नाव अंजनेय ठेवले गेले. याच जिल्ह्यातील पालकोट येथे बाली आणि सुग्रीव यांचे राज्य होते. असे पण म्हणतात, की इथेच शबरीचा आश्रम होता. या पवित्र घाटात एक गुफा अशी आहे जिचा संबंध थेट रामायण काळाशी आहे. माता अंजनी या स्थानावर रोज भगवान शिवाची आराधना करण्यासाठी यायच्या आणि याच कारणामुळे इथे 360 शिवलिंग आहेत. हनुमानाच्या अनेक मंदिरापैकी या मंदिराला विशेष महत्व आहे. त्याचे कारण बाळ हनुमान हे आपल्या आई अंजनी यांच्या कडेवर आहेत. 

काही जाणकारांचे असे म्हणणं आहे, की गुजरातमधील डांग जिल्हा हा पूर्वीच्या काळात दंडकारण्य प्रदेशाच्या नावाने ओळखला जायचा. तिथे प्रभू श्रीराम यांनी दहा  वर्षे वास्तव्य केले होते. येथील आदिवासी लोकांची प्रबळ श्रद्धा आहे, की येथील अंजना पर्वतामधील अंजनी गुफेत हनुमानाचा जन्म झाला. हरयाणामधील कैथल शहरदेखील हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. मान्यतेनुसार कैथलचे प्राचीन नाव कपिताल होते. कपिथल हा कुरु साम्राज्याचा प्रमुख भाग होता. पुराणानुसार हे वानर राज हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. कपीचे राजा असल्यामुळे हनुमानाचे वडील केसरी यांना कपिराजा असे म्हणतात.

कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपी शहरात हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. काही विद्वानांच्या मते, सध्याचा हा प्रदेश प्राचीन किष्किंधा नगरी आहे आणि याचा उल्लेख  वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसात  आहे. असे मानले जाते, की हनुमानाचा जन्म या प्राचीन किष्किंद शहरात झाला होता आणि याच ठिकाणी हनुमान  भगवान श्रीरामांना प्रथम भेटले. बजरंग बली हनुमानाचा जन्म कोठे झाला या मुद्द्यावरून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे. कर्नाटकमधील शिवमोगातील धर्मगुरुंनी हनुमानाचा जन्म हा उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण इथे झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी कर्नाटकातीलच दुसर्‍या एका धर्मगुरुंनी दावा केला होता, की हनुमानाचा जन्म हा कोप्पल जिल्ह्यातील आणेगुडीजवळच्या किश्किंदा भागात असलेल्या अंजनाद्री पर्वतरांगेत झाला होता. कर्नाटकातील शिवमोगा येथील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख असलेल्या राघवेश्‍वरा भारती यांनी रामायणामधील काही वाक्यांचा हवाला देत म्हटले आहे, की खुद्द हनुमानानेच सीतेला सांगितले होते, की त्याचा जन्म गोकर्ण इथे झाला आहे. राघवेश्‍वरा भारती यांनी म्हटले, की रामायणातील या वाक्यामुळे हे सिद्ध होते, की हनुमानाची जन्मभूमी ही गोकर्ण होती तर कर्मभूमी ही अंजनाद्री येथील किश्किंदा होती. कर्नाटकातील धर्मगुरुंचे दावे ऐकून संतापलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान विश्‍वस्त मंडळाच्या अधिकार्‍यांनी दावा केला आहे, की हनुमानाचा जन्म कर्नाटकात नाही, तर आंध्र प्रदेशात झाला होता. तिरुपती इथल्या सात पर्वतांपैकी अंजनाद्री नावाच्या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता असा दावा करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशने कर्नाटकाचा दावा फेटाळला आहे. 

तज्ज्ञांची समिती ठरवणार जन्मस्थळ

तिरुमला तिरुपती देवस्थानातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये वेदांचा गाढा अभ्यास असलेले तज्ज्ञ, पुरातत्वाचा अभ्यास करणार्‍या व्यक्ती आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. या समितीला 21 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे कर्नाटकात अंजनाद्री येथील किश्किंदा भागाला हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून घोषित करण्याच्या योजनेला वेग आला आहे. हंपीजवळच्या किश्किंदा भागाचा रामायणामध्ये उल्लेख असून याच ठिकाणी लक्ष्मणाची आणि हनुमानाची भेट झाल्याचे सांगितले जाते.

COMMENTS