नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमधील उभी फूटनंतर आता दोन्ही गटांकडून पक्षावर ताबा मिळविण्यासाठी लढाई लढण्यास सुरूवात झाली असून, शुक्रव

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमधील उभी फूटनंतर आता दोन्ही गटांकडून पक्षावर ताबा मिळविण्यासाठी लढाई लढण्यास सुरूवात झाली असून, शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा गंभीर आरोप अजित पवार गटाने केला आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीला स्वतःच शरद पवार उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून कोणतेही नेते या सुनावणीला हजर नव्हते. यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. तर अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली. दोन्ही गटाकडून खरा पक्ष आपलाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला दुपारी चार वाजता पार पडणार आहे.
यावेळी अजित पवार गटाने सुनावणी वेळी म्हटले आहे की, जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 43 आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदारही आमच्या बाजूने असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. तसेच लोकसभेतील 5 पैकी 1 व राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावाही अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात केला आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारं शरद पवार गटाचे पत्र बेकायदेशीर आहे. मुख्य प्रतोद आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात. हा मनमानी पद्धतीचा कारभार आहे. हे लोकशाहीला धरून नाही, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या भूमिकेवर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.
अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही – केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. अजित पवार गटाची भूमिका पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आमच्या बाजून आहे, असे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.
शरद पवारांची सर्वोच्च न्यायालयात धाव – राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी होण्यापूर्वीच शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाच्या सर्व आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अजितदादा गटाच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी, या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संघर्षही शिवसेनेच्याच वाटेने जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढ होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
COMMENTS