Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन

मुंबई/प्रतिनिधी ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असून, सरकार मराठा समाजासोबत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा

मुख्यमंत्र्यांनी केले आमदार सरोजिनी अहिरे यांचे कौतुक
बांगलादेशात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी
पुण्यात पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलांचे साम्राज्य

मुंबई/प्रतिनिधी ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असून, सरकार मराठा समाजासोबत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करण्याची काम करणार आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. भीमाशंकर येथे ते सोमवारी माध्यमांशी ते बोलत होते.
ओबीसी समाजाला मिळणारे लाभ मराठा समाजाला दिले जात आहेत. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आधी आरक्षण दिलं होत, तीच भूमिका आजही सरकारची आहे. सर्वांच्या सहकार्यांने टिकेल असे आरक्षण देण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे, विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भावीक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील 68 कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणार्‍या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

ओबीसी समाजावर अन्याय होवू देणार नाहीः फडणवीस – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ओबीसींवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. ओबीसी व मराठा या 2 समाजात संघर्षाची ठिणगी उडेल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने आश्‍वस्त राहावे, असे फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काही झाले तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही वा काढूनही घेतले जाणार नाही. याबाबत ओबीसींनी भीती बाळगू नये. ओबीसी समाजानेही या प्रकरणी कोणताही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सोमवारी नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षण हाच माझ्यावर उपचार ः मनोज जरांगे – मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण हाच माझा उपचार आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार. दुसर्‍यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय कराल, आता आमच्याकडेही बघा असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. ओबीसीवर देखील अन्याय करू नका आणि आमच्यावर पण अन्याय करू नका. पण आम्हाला सरसकट आरक्षण द्या भिजत घोंगडे ठेऊ नका, असेही ते म्हणाले.

COMMENTS