समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा जितका भीषण आहे, तितकाच तो काही प्रश्न निर्माण करणारा देखील आहे. जीवन इतके वेगवान झाले आहे की, एका शहरातून दुस
समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा जितका भीषण आहे, तितकाच तो काही प्रश्न निर्माण करणारा देखील आहे. जीवन इतके वेगवान झाले आहे की, एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी माणसं रात्रीची वेळ निवडतात. कारण दोन्ही शहरांमधील दिवसाची काम आटोपता यावी, हा त्यामागचा उद्देश असतो. रात्री झोपेची वेळ ही प्रवासाच्या दरम्यान झोपेची सोय झाली तर प्रवास आणि झोप दोन्ही होते. यामुळे अलीकडच्या काळात रात्रीच्या प्रवासात मोठी वाढ झाली आहे. नागपूर ते पुणे हा मोठा प्रवास. शक्यतो प्रवाशांची पहिली पसंती ही प्रवास वाहन म्हणून रेल्वेला असते. परंतु, अलीकडच्या काळामध्ये रेल्वेच्या तिकीट एजंट संस्थांची संख्या उदंड प्रमाणात वाढल्यामुळे, रेल्वे त्यांच्याकडे मुबलक कोटा देऊन मोकळी होते. जवळपास पहिल्या दिवसापासूनच लोकांना वैयक्तिक तिकीट काढताना वेटींग चे स्वरूप दिसते आणि त्यामुळे लोक खाजगी वाहतुकीकडे वळतात. खाजगी वाहतूक ही इतकी असुरक्षित झाली आहे की, कोणत्याही नियमांचं पालन त्यांच्याकडून केलं जात नाही. त्यातच आरटीओ सारखी यंत्रणा ही तर केवळ मलिदा आणि पैसा गोळा करण्यातच मश्गुल असते. त्यामुळे कोणत्याही नियमांशी त्यांना देणंघेणं राहिलेलं नाही. अशा प्रवासी वाहनांवर कोणत्याही प्रकारची कठोर देखरेख त्यांची नसते. गाडीचा चालक हा कसा आहे, किती अनुभवी आहे, कशी गाडी चालवतो, दीर्घ प्रवासासाठी किती चालक त्यावेळी गाडीकडे आहेत, त्या गाडीची दररोज गॅरेजमध्ये देखभाल होते की नाही, गाडीचा मेंटेनन्स कसा आहे, या सर्व बाबी आरटीओच्या नियमानुसार अपडेट असाव्यात. त्यात मात्र आरटीओंची बोंबाबोंब चाललेली असते !केवळ मलिदा गोळा करणे यापलीकडे आरटीओंची कोणतीही कामगिरी या क्षेत्रामध्ये दिसत नाही! समृद्धी महामार्गावर काल झालेला अपघात हा २५ जणांना जिवंत जाळणारं हे कांड इतकं भीषण आहे की, याची जबाबदारी ही व्यवस्था आणि यंत्रणेवरच आहे , असे आता जाहीर करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने बसच्या चालकाने सांगितलं की, गाडीचा टायर फुटला आणि मग गाडीने पलटी घेतली. परंतु, याविषयी आरटीओंनी विसंगती दाखवली आहे. अर्थात आरटीओच्या तपासामध्ये त्या विसंगती निश्चितपणे येतील. परंतु या खाजगी वाहतुकीचे जे नियम आहेत, एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासी तोपर्यंत नेऊ शकत नाही जोपर्यंत त्या प्रवासीचा रिटर्न प्रवास त्या गाडीमध्ये दिसत नाही. कारण, प्रवासी वाहतूक करणारी वाहने नसून ही टुरिस्ट वाहने आहेत. परंतु, यंत्रणांची डोळे झाक, शासन व्यवस्थेची डोळे झाक, या सगळ्या प्रकारातून सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य माणूस एकाच ठिकाणी क्रूर पद्धतीने बळी जातो तर त्याची दखल यंत्रणा, सरकार आणि व्यवस्थेने घेतल्याशिवाय या लोकांना राज्याकडून खरी श्रद्धांजली अर्पित होणार नाही. राज्यातील सर्व खाजगी प्रवासी वाहतूक सक्त नियम लावून काटेकोरपणे तपासायला हवेत. राजकीय लोकांचा हस्तक्षेप यात सहन केला जाऊ नये. नागपूर सुटलेल्या त्या खाजगी प्रवासी वाहनाचे सर्व काही नियमानुसार आहे का, हे प्राधान्याने तपासायला हवे. वास्तविक एकाच बाजूने गाडीत दोन चालक असावेत. परंतु, या खाजगी वाहनांकडून एका बाजूने एक तर दुसऱ्या बाजूने एक अशा नेमणूका असतात. रेल्वे आणि सार्वजनिक बस पेक्षा तीन ते सहा पटीने भाडे आकारणाऱ्या या खाजगी प्रवासी वाहनांचा योग्यवेळी बंदोबस्त व्हायला हवा.
COMMENTS