इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या दीड महिन्यापासून मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, यात 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा हिंसाचा
इम्फाळ/वृत्तसंस्था ः गेल्या दीड महिन्यापासून मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून, यात 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा हिंसाचार आटोक्यात आणण्यात केंद्रासह आणि मणिपूर राज्य सरकारला अपयश आले असून, याप्रकरणी संताप वाढतांना दिसून येत आहे. गृहमंत्री अमित शाह मणिपूरमध्ये येवूनही हिंसाचार थांबलेला नाही. याप्रकरणी भाजपच्या 9 आमदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जनतेचा विश्वास उडाला असल्याचे हताश उद्गार या पत्रात काढले आहेत.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाला. या आंदोलनाला 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. हिंसाचाराच्या एक महिना आधी भाजपच्या चार आमदारांनी आपली पदं सोडली होती. तेव्हाचे सीएम बिरेन सिंह यांनी सांगितले होते की, ’प्रत्येकाला आपापल्या समस्या असतात. त्यामुळेच त्यांनी हे पद सोडले आहे. बाकी सरकारमध्ये काही अडचण नाही.’ आता मणिपूरमधील हिंसाचाराप्रकरणी पंतप्रधानांना पत्र पाठवणार्या नऊ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत ज्यांनी यापूर्वी आपल्या प्रशासकीय आणि सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता. अशामध्ये आता मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण नुकताच मेईतेईच्या 30 आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,अर्थमंत्री निर्मला सीतारामण, निशिकांत सिंह यांची भेट घेतली. मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्याचसोबत तोडफोड आणि घरं जाळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 2000 घरे आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि मणिपूर पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. असे असतानाही हिंसाचार सुरुच आहे. मणिपूरमध्ये चिघळलेली परिस्थिती सामान्य करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. परंतु अद्याप कोणतीही लक्षणीय सुधारणा दिसून येत नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र रखडले – ज्या नऊ भाजप आमदारांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे त्यांनी असे सांगितले आहे की, ’जनतेचा सध्याच्या सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. या हिंसाचाराचा असा परिणाम झाला आहे की, ज्या हातात पुस्तक आणि पेन असायचे त्यांच्या हातात आता बंदुका, दुर्बीण, गोळ्या आणि धोकादायक शस्त्रे आहेत. मणिपूरच्या लोकांना राज्य आणि केंद्राचे सुरक्षा दल त्यांना सुरक्षा पुरवत असल्याची ग्वाही देण्यात आली होती. पण आता त्यांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे या लोकांनी स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्र उचलल्यामुळे हिंसाचार वाढला असून, त्यावर नियंत्रण मिळवणे केंद्र सरकारसह मणिपूर राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS