पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे होणार… जमिनीसाठी शेतकर्‍यांना नोटिसा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे होणार… जमिनीसाठी शेतकर्‍यांना नोटिसा

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी केली जाणार असून, यासाठी संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

तेलीखूंटला घरफोडीत 41 हजाराची चोरी
कोपरगावचा किराणा व्यापारी हा देशाच्या अर्थचक्राला गती व दिशा देणारा –  तनसुख झांबड
अनिल पावटे यांना उत्कृष्ट अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी- पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी केली जाणार असून, यासाठी संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, जमिनीचा मोबदला किती मिळणार, यावर चर्चा झडू लागल्या आहेत. 

    पुणे-संगमनेर-नाशिक या मार्गादरम्यान रेल्वेची नवीन दुहेरी मध्यम तसेच उच्च वेगवान ब्रॉडगेज लाईन होणार असून, तिच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी जमीन संपादित केली जाणार आहे. ही जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याची प्रक्रिया यात राबवली जाणार आहे व तिची अंमलबजावणी संगमनेर तालुक्यात सुरू झाली आहे. भूसंपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व महारेलचे अप्पर महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांच्या नावाने संबंधित गावातील शेतकर्‍यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

सुमारे 18 गावांचा समावेश

पुणे-संगमनेर-नाशिक हा 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार आहे. हा रेल्वे मार्ग पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे. या मार्गावरून जाणार्‍या रेल्वेचा वेग जवळपास ताशी 180 किलोमीटर असणार आहे. या रेल्वे मार्गावर विशेष म्हणजे अठरा बोगदे असणार आहेत. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात आले असून, संगमनेर तालुक्यातील सुमारे 18 गावांतील जमिनी यासाठी खरेदी केल्या जाणार आहेत. या गावांमध्ये तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा, ऐलखोपवाडी, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, जांबुत, साकूर, जांभुळवाडी, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपारणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर पोखरी आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये जमिनीची मोजणी झाली असून त्या-त्या गावांतील प्रस्तावित प्रकल्प क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे. आता या गावांतील ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहेत, त्यांना नोटीसा पाठविण्यात येत आहेत. पोखरी हवेलीतील 264 शेतकर्‍यांच्या जमिनीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. पिंपरणेतील 78 शेतकर्‍यांचे क्षेत्र प्रस्तावित आहेत. याप्रमाणे अन्य गावांतीलही कमी-जास्त क्षेत्र प्रस्तावित असून शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या नोटिसा दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या हरकती किंवा सूचनांची चौकशी करण्यात येणार आहे व नंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

नुकसान भरपाई निकषाची उत्सुकता

पुणे-संगमनेर-नाशिक या रेल्वेसाठी भूसंपादन करीत असताना, जर रेल्वे ही शेती क्षेत्रातून गेल्यानंतर दुतर्फा बाजूला अल्प स्वरूपात जागा सुटत आहे. या जागेचा शेतकर्‍यांना काहीच फायदा होणार नाही. तसेच भूसंपादन करीत असताना कुक्कुटपालन, घर, ओटा, कूपनलिका (बोअर वेल), कांद्याची चाळ, विहिरी व इतर अनेक स्वरूपात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नुकसानीच्या भरपाईच्या निकषांचीही उत्सुकता आहे.

COMMENTS