Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटकात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

सोनिया गांधींच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगात तक्रार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या असून, आता बुधवारी मतदान होणार आहे. मात्र सोमवारी

‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.
औरंगाबादमध्ये अभियंता अडकला हनीट्रपमध्ये
जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या असून, आता बुधवारी मतदान होणार आहे. मात्र सोमवारी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. भाजपने सोमवारी सोनिया गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. कर्नाटकातील त्यांच्या एका वक्तव्याबाबत भाजपने हे पाऊल उचलले आहे. काँग्रेस कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला तडा जाऊ देणार नाही, असे सोनियांनी रविवारी म्हटले होते.
कर्नाटकातील जनतेने पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला जनादेश दिला होता. मात्र, घोडेबाजार करून आमदार विकत घेऊन चोरी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेच्या पैशाची चोरी केली. चोरी करून आलेले सरकार चोरीच करणार. देशातील सर्वात भ्रष्ट भाजप सरकारला यावेळी जागा दाखवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. सदलगा (ता. चिक्कोडी) येथे काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्या आल्या सरकारी सेवेत अडीच लाख नोकर्‍या, तर 10 लाख युवकांना रोजगार देऊ. तसेच पदवीधर युवकांना दोन वर्षांसाठी 3 हजार रुपये बेकार भत्ता देऊ. लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्या काँग्रेसला 150 हून अधिक जागा जिंकून देऊन बहुमतांनी सत्ता द्या. कर्नाटकाची जनता सुज्ञ असून, ती काँग्रेसला बहुमत देईल याची खात्री आहे, असा विश्‍वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
प्रियंका गांधी यांनी विजयनगरमध्ये रोड शो केला. यासह प्रियांकाने निवडणूक प्रचाराची सांगता केली. तर राहुल गांधी यांनी नोकरदार महिलांसोबत बसमध्ये बसून बसस्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सेल्फीही काढले. या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 65 हून अधिक सभा आणि सुमारे 20 रोड शो केले आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचीही सभा होती. सोनिया गांधी अनेक वर्षांनंतर प्रचारासाठी आल्या होत्या. सोनिया यांनी हुबळी येथे जाहीर सभेला संबोधित केले. या वक्तव्याबाबत शोभा करंदलाजे यांनी हे विधान धक्कादायक आणि अमान्य असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करताना त्यांनी सोनिया गांधींनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे सांगितले. सोनियांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले.

भाजपने घटनाबाह्य मुस्लिमांचे आरक्षण संपवले ः शहा – काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, भाजपने 4 टक्के मुस्लिम आरक्षण संपवले आहे, कारण ते घटनाबाह्य होते. आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. काँग्रेसने तुष्टीकरणाच्या धोरणाखाली मुस्लिम आरक्षण दिले होते, ते आम्ही काढून टाकले आहे.
आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुस्लिम आरक्षणाचा पत्ता टाकला आहे. आमच्याच सरकारने मुस्लिमांचे असंवैधानिक आरक्षण रद्द केल्याचे सांगून काँग्रेस जर मुस्लिमांना 6 टक्के आरक्षण देणार असेल तर ते कसे देणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. प्रचार संपायच्या आतमध्ये काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, असे ओपन चॅलेंज अमित शाह यांनी दिले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिमांचे आरक्षण वाढवून 6 टक्के करणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु कुणाचे कमी करुन मुस्लिमांना देणार, हे स्पष्ट केले नाही. ओबीसींचे आरक्षण कमी करणार की लिंगायत समाजाचे? प्रचार संपण्याच्या आधी काँग्रेसने हे स्पष्ट करावे. मुस्लिमांना दिलेले 4 टक्के आरक्षण आमच्या पक्षाने संपवले, कारण ते असंवैधानिक होते. आपल्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. काँग्रेसने तुष्टीकरणाची खेळी करुन मुस्लिमांना आरक्षण दिले होते. परंतु आम्ही ते काढून टाकले असे देखील शहा यावेळी म्हणाले.

… तरीही पंतप्रधान गप्प का? ः राहुल गांधी – विकास कामातील 40 टक्के कमिशनबाबत कंत्राटदार संघटनेने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. सरकारच्या भ्रष्टाचारावर अनेकांनी जाहीर टीका केली. मात्र, अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची दखल घेतलेली नाही. यामागचे गौडबंगाल काय? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकातील भाजप सरकार हे चोरी करणारे सरकार आहे. येथे ठेकेदारांकडून 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेतले जाते. त्यामुळे जर अशा मंडळींच्या हातात पुन्हा सत्ता गेली, तर भविष्यात या कमिशनच्या मागणीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ होऊन विकासाला खीळ बसेल, अशी भीतीही गांधी यांनी व्यक्त केली.

COMMENTS