राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
केंद्रसरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
COMMENTS