प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली शहराध्यक्षांवरील नाराजी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली शहराध्यक्षांवरील नाराजी

अहमदनगर/प्रतिनिधी-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच नगर शहरातील भाजपमध्ये असलेला बेबनाव शुक्रवारी उघड झाला. भटक्या विमुक्त आघ

प्रवरा नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात l DAINIK LOKMNTHAN
जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे

अहमदनगर/प्रतिनिधी-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच नगर शहरातील भाजपमध्ये असलेला बेबनाव शुक्रवारी उघड झाला. भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नितीन शेलार यांनी शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्यावर जाहीर टीका केली व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकारामुळे काहीकाळ पाटीलही अस्वस्थ झाले. पण मग त्यांनी तक्रारदार शेलार यांना व गंधे यांना कानपिचक्या दिल्या. संघटनात्मक तक्रारी जाहीरपणे करायच्या नसतात, मला वैयक्तिक सांगा, असे शेलारांना सांगितले तर संघटनात्मक रचना आठ दिवसात झाली नाही तर शहराध्यक्ष बदलाचा विषय होईल, असे गंधेंना सुनावले.

पक्षाच्या संघटनात्मक आढाव्यासाठी पाटील शुक्रवारी नगरमध्ये होते. सारडा महाविद्यालयात त्यांनी नगर शहरातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजप हे आपल्या सर्वांचे एक कुटुंब आहे. त्यामुळे आपण आपल्या समस्या कुटुंबातील मोठयांकडे जर मांडल्या तर आवर्जून व हक्काने त्या सोडवल्या जातील, आपल्या कुटुंबामध्ये जर काही घटना घडली तर एकमेकांना आपण साथ दिली पाहिजे. कुटुंबातील मोठ्यांना सांगणे ही सुद्धा आपली जबाबदारी असते, असे ते बोलत असतानाच पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नितीन शेलार यांनी, शहरामध्ये जे अध्यक्ष नेमले आहेत, त्यांना अगोदर बदला, अशी जाहीर मागणीच केली. ते पुढे म्हणाले, ’मी कोविड काळात रुग्णालयात उपचार घेत असल्याने तेव्हा मी कोणाला भेटू शकलो नाही, मी आजारी असताना मला भेटायला साधे आपले शहर अध्यक्ष आले नाही, साधी विचारपूस केली नाही. उलट, त्यादरम्यान ते मला म्हणाले की, तुला जर कार्यकारिणी करता येत नसेल, तर तू राजीनामा दे, असे गंधे म्हणाल्याची तक्रार पाटील यांच्याकडे जाहीरपणे केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हस्तक्षेप करत, अरे बाबा, मी तुम्हाला जे काय सांगितलं, ते तुम्ही लगेच इथे कशाला अंमलात आणता, त्यासाठी मी तुम्हाला वेगळा वेळ देतो, तुमच्याशी चर्चा करतो, असे शेलार यांना त्यांनी सांगितले. त्यावेळेस शेलार म्हणाले, अहो, तुम्हीच आता बैठकीमध्ये समस्या सांगा, असे सांगितले. मग ही पण मोठी समस्याच आहे, शहराध्यक्ष जर असे मुजोर वागत असतील व तुमच्या शेजारी बसून ते हसत असतील, तर काय उपयोग?, अगोदर तुम्ही त्या मुजोर शहराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी जाहीर मागणी त्यांनी केली. या घडलेल्या प्रकारामुळे बैठकीत काही काळ गोंधळ उडाला व तणावही निर्माण झाला. पण अखेर प्रदेशाध्यक्षांनीच यावर पडदा टाकला, असे सूत्रांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष पाटील शुक्रवारी सकाळीच नगरमध्ये दाखल झाले. शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर लगेच मंडलनिहाय बैठकांना सुरुवात करण्यात आली. केडगाव आणि मध्य मंडलाची बैठक त्या-त्या मंडलात जाऊन घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे, नगर जिल्ह्याचे प्रभारी मनोज पांगारकर उपस्थित होते.

शहर जिल्हाध्यक्षांना सल्ला

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आनंदधाम येथे आचार्यश्री आनंदऋषी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तेथेच बाहेर पत्रकारांशी संवाद केला. पत्रकारांचे एक-दोन प्रश्‍न व त्यावर पाटलांची उत्तरे झाल्यावर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी, आवरते घ्या, पुढे कार्यक्रमाला उशीर होतोय, असे पत्रकारांना सांगितले. पण, पत्रकारांचे प्रश्‍न बाकी असल्याने खुद्द पाटील यांनीच गंधे यांना मध्येच थांबवले व पत्रकारांसमोरच त्यांना एक सल्लाही दिला की, पत्रकारांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय कधीही निघायचे नसते. त्याचीही चर्चा शहर भाजपमध्ये होती.

फडणवीसांचे कौतुक

राज्याच्या विषयावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी तीन-चार ठिकाणी पत्रकारांशी स्वतंत्र संवाद साधला. यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर, सातारा, सांगली भागात पूरस्थिती गंभीर होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी महसूलमंत्री होतो. त्यावेळी आम्ही 4 लाख 73 हजार लोकांना पुरातून बाहेर काढले. बोट, हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. सुमारे पंधरा दिवस लोकांना निवारा, अन्न आणि जनावरांच्या चार्‍याची सोय केली होती. तरीही काँग्रेसने आमच्यावर टीका केली. पण, आताही त्या भागात पूरस्थिती गंभीर असताना ठाकरे घरातच बसून आहेत व त्यांचे मंत्रीही मदतीला गेले नाहीत. त्यांनी पूरग्रस्त भागात तळ ठोकून बसायला पाहिजे. पटापट निर्णय घेऊन परिपत्रके काढली पाहिजेत. त्यावेळी ही कामे फडणवीस यांनी वेगाने केली होती, असे सांगून पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री असले तरी ते काहीही कामाचे नाहीत. करोनाच्या काळातही त्यांना दिलासादायक काम करता आले नाही. आता पुरातही त्यांचे काम दिसत नाही. कोल्हापूरकरांचे हाल मात्र सुरूच आहेत. मंत्री झोपा काढत आहेत का? राजकारण करू नका म्हणता तर मग तुम्ही जे करता ते आम्ही केवळ पाहात राहायचे का? दरवेळी मदतीचा विषय आला की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. राज्याची तिजोरी मात्र उघडायची नाही, असा प्रकार सुरू आहे,’ अशी टीका पाटील यांनी केली.

COMMENTS