Homeताज्या बातम्यासंपादकीय

दु:खाचा “मोहोळ” उठू नये ! 

काही वर्षांपूर्वी "दी स्लमडॉग मिलेनियर" नावाचा चित्रपट येऊन गेल्याचे आपल्या सगळ्यांना आठवत असेलच! मुंबईसारख्या महानगरामध्ये आणि त्यातही धारावी या

संसद, लोकांच्या इच्छेचे मूर्त स्वरूप !
ओबीसींच्या प्रभावी काळातही……! 
घटनात्मक वर्चस्व कुणाचे !

काही वर्षांपूर्वी “दी स्लमडॉग मिलेनियर” नावाचा चित्रपट येऊन गेल्याचे आपल्या सगळ्यांना आठवत असेलच! मुंबईसारख्या महानगरामध्ये आणि त्यातही धारावी या एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी म्हणून गणल्या गेलेल्या भागात थांबून ब्रिटिश दिग्दर्शकाचा हा सिनेमा अनेक ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी ठरला होता. याच चित्रपटासाठी संगीताचा ऑस्करही ए. आर. रहमान या महान संगितकाराला मिळाला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, एकाच भागात राहणाऱ्या कुमारवयीन असलेल्या दोन मुलांवर बेतलेल्या कथानकाची गुफन करून बनवला गेला. त्यातील एक अल्पावधीतच गुन्हेगारी च्या माध्यमातून खूप पैसा कमवतो. पैशांचीच गादी करून त्यावर विश्रांती घेणे, यासह पैसाच सर्वकाही समजणारा युवक गुन्हेगारी क्षेत्रात नामांकित होतो. तर, दुसरा अनेकांच्या घरी नोकर बनून काम करताना त्या त्या ठिकाणी काम करताना तेथील चर्चा ऐकून आपल्या माहिती ज्ञानात भर करणारा. परंतु, केवळ खाजगी नोकर म्हणून नोकरी करणारा. हे दोन्ही कुमारवयीन मित्र अशिक्षित दाखवलेले. गुन्हेगारी करणारा आपला मित्र असणाऱ्याला नेहमी पैसे देण्यास उत्सुक असणारा. परंतु, गुन्हेगार मित्राचा पैसा घ्यायचा नाही, यावर ठाम असणारा मित्र.  

     आपल्याकडे वर्षाबादाने चित्रवाहीनीत येणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या कार्यक्रमाची जाहिरात येते. गरीब मित्र त्यात दुसऱ्याकरवी प्रवेश अर्ज भरून पाठवतो. त्यात त्याची निवड होते. करोडपतीच्या कार्यक्रमात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देणारा तरूण त्याच कार्यक्रमात यशस्वी होऊन कोटींचे बक्षीस मिळवतो. ज्यादिवशी तो कोटींची कमाई बक्षिसीतून मिळवतो, त्याच रात्री गुन्हेगारी क्षेत्रात कोट्यधीश बनलेला त्याच्या मित्राचा त्याच रात्री नोटांच्या गादीवरच खून होतो; इथेच चित्रपट संपतो. 

      समाजाला शिकवण मिळावी म्हणून अशा कलाकृती करोडोंच्या खर्चातून निर्माण केल्या जातात. परंतु, त्यापासून बोध न घेणाऱ्या पिढ्या बरबाद कशा होतात हे अनेक महानगरांच्या टोळी युध्दात दिसून येते. अर्थात, कोणत्याही महानगराच्या विकासाला टोळी युध्दाचा शाप असतो, असे म्हणण्याची पाळी, यावी इतपत हे सगळे घडते. औद्योगिक विकास ही प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा उद्योगाचा पाया बनली. आयटी सारख्या तंत्रज्ञानाने शहरांच्या विकासाची नवी प्रणाली समोर आणली. लाखोंचे पगार असणाऱ्या नोकऱ्या असलेल्या आयटी तज्ज्ञांना नोकरीच्या वेळेनंतर प्रशस्त असे घर लागते. यामुळे, एकाचवेळी आयटी क्षेत्रासारख्या अनेक उद्योगांच्या उभारणीसाठी आणि त्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या घरांसाठी जमीनीची उपलब्धता लागते. यात मध्यस्थी म्हणून एका वर्गाचा उदय होतो. ज्याला अनेक बिल्डर्स आणि भांडवलदार आपल्या ताब्यात ठेवतात. त्यासाठी त्यांना पोसणे आणि मध्यस्थ म्हणून टक्केवारी देतात. यात होणारी मध्यस्थाची आर्थिक भरभराट डोळ्यात भरण्याजोगी असते. मध्यस्थाकडे कार, बंगला आणि हुजरे गोळा होतात. त्याचे सोन्याच्या दागिन्यांची हौस आदी बाबी ठळकपणे दिसतात. असा हा बाह्य भपका तरुणांच्या आकर्षणाचे आणि त्यातूनच अकाली अनैसर्गिक मृत्यूचे कारण बनला आहे. भांडवल घेऊन विकास करायला निघालेल्या नवश्रीमंतांनी समाजात आणलेल्या वैमनस्याच्या वातावरणाला वेळीच थांबवावे! यंत्रणांनी आपली कर्तव्ये प्रामाणिक बजवावीत! जेणेकरून कोणत्याही कुटूंबात दु:खाचा “मोहोळ” उठू नये!

COMMENTS