Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहरादेवी संस्थांनसाठी 593 कोटींचा निधी

बंजारा समाजाला निधी कमी पडू देणार नाहीः मुख्यमंत्री शिंदे

वाशिम/प्रतिनिधी ः बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी 593 कोटी रुपये विकासनिधी दिल्

राजकीय वादातून चक्क ढाबाच दिला पेटवून | LOKNews24
काँगे्रस गळती रोखणार कशी ?
जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | LOK News 24

वाशिम/प्रतिनिधी ः बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी 593 कोटी रुपये विकासनिधी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. 50 कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार असल्याचे सांगून त्यांनी नवी मुंबई येथे बंजारा भवन उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संतश्री सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी गडावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री संजय राठोड उपस्थित होते.
संजय राठोड यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी उभा राहिला. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची पाठराखण केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे पोहरादेवी येथे सांगितले. आनंदात सर्व सोबत येतात, संकटात कोणी नसतो. मात्र, अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत, अशी पुष्टी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जोडली. संजय राठोड संकटात असताना त्यांच्याशी आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांशी आमचे काय देणे-घेणे, असा विचार आम्ही केला नाही. तो आमचा आहे. आम्ही आपले आहोत. आपल्यात जिव्हाळा आहे, म्हणूनच आज पोहरादेवी येथे जनसागर उसळला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सेवालाल महाराज लढवय्ये होते. समाजावर आक्रमण झाले तेव्हा लढायला शिकवले. त्याचवेळी शांतीचा संदेशही त्यांनी दिला. त्यांनी बावीस प्रतिज्ञा समाजाला दिल्या. त्या प्रतिज्ञांचा अंगिकार आपण सर्वांनी करायला हवा. खर्‍या अर्थाने या प्रतिज्ञा विश्‍वासाठी आहे.फडणवीस म्हणाले, लाल किल्ल्याची निर्मिती लकीशहा बंजारा यांनी केली होती. आज जिथे भारताचे पॉवरसेंटर आहे, पंतप्रधान जिथे राज्य चालवतात ते रायसेना गाव होते तेही लकीशहा बंजारा यांचे होते. बंजारा समाजाची आर्थिक परिस्थिती चांगली राहीलेली नाही. बंजारा समाजावर आज निर्वासित होण्याची वेळ आली आहे. तांड्याच्या विकासाचा आराखडा सरकार हातात घेणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तांड्यांपर्यंत विकास पोहचवून दाखवू. बंजारा समाजाला शिक्षणात वंचित राहण्याची वेळ येऊ नये. बंजारा मुलामुलींना शिक्षण घेता आले पाहीजे, त्यांच्या राहण्याची सोयही करू. मोठे परिवर्तन येत्या काळात घडणार आहे. नॉन क्रिमिलेअरची अट जर कायद्यात बसत असेल तर त्यावर निर्णय घेवू. घोषणा करू आणि पूर्ण होणार नाही असे नको, त्यामुळे या प्रकरणी महाधिवक्ता यांचे मत याबाबत घेवू मग हे काम करू, असे आश्‍वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

पोहरागडावर रेल्वे लाईन येणार ः फडणवीसांची घोषणा
पोहरादेवी गडावर झालेल्या कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वर्धा-नांदेड रेल्वे रूट पोहरागडावरून गेला पाहिजे. ही मागणी मोदीजींनी मान्य केली होती. त्यासाठी या बजेटमध्ये मोदीजींनी पोहरागड रेल्वे रुटसाठी 500 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे लवकरच पोहरागडमध्ये रेल्वेलाईन येईल. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अडीचशे कोटी रुपयांचा रस्ता आपण तयार करत आहोत. ज्यामुळे भक्तांना त्रास सहन करावा लागणार नाही. मोदीजींच्या सरकारने बंजारा समाज आणि भटक्या विमुक्तांकरता एक नवीन महामंडळ सुरू केले आहे. त्यामुळे बंजारा समाजाचा विकास होणार आहे. त्याचवेळी आपण मागणी केली की, महाराष्ट्र सरकारने देखील महामंडळाला अधिकचा निधी द्यायला हवा. त्याची काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांनी तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. ही तिजोरी महामंडळासाठी रिकामी करण्याचे काम आपण करू, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

COMMENTS