देवळाली प्रवरा/प्रतिनिधी-तीन महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यात घडलेल्या पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींविरोधात 942 पानांच
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी-तीन महिन्यांपूर्वी राहुरी तालुक्यात घडलेल्या पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींविरोधात 942 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. राहुरी तालुक्यातील गणेगावच्या जमिनीच्या वादातून कान्हू मोरेसह त्याच्या साथीदारांनी दातीर यांचा खून केल्याचे दोषारोप पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात गाजलेल्या या हत्याकांडाचा सुरुवातीचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तर नंतरचा तपास श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पूर्ण केला. त्यांनीच सर्व आरोपींना गजाआड करुन या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
तीन महिन्यांपूर्वी 6 एप्रिल रोजी भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील पत्रकार व दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक असलेले रोहिदास दातीर दुचाकीवरुन मल्हारवाडी रस्त्याने घरी जात असताना पाठीमागून आलेल्या पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातील चौघांनी त्यांना सातपीरबाबा दर्ग्याजवळ अडवून मारहाण करीत त्यांचे अपहरण केले होते. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केल्यावर दातीर यांच्या पायातील चप्पल आणि त्यांची दुचाकी रस्त्यावरच पडलेली आढळून आली. त्यांचे अपहरण झाल्याने दातीर यांच्या पत्नीने राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली व पोलिसांनी अज्ञात व्यक्तींंविरोधात गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी मारहाण करुन खून केलेल्या दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालयाजवळ टाकून दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांनी नंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक दुधाळ यांनी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25, रा.एकलव्य वसाहत) व तौफीक मुक्तार शेख (वय 21, रा.राहुरी फॅक्टरी) या दोघांना शिताफीने अटक केली.
त्यानंतर उपअधीक्षक मिटकेंकडे तपास आल्यावर त्यांनी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार कान्हु गंगाराम मोरे याला व नंतर अक्षय कुलथे याला उत्तरप्रदेशातील फत्तेपूर जिल्ह्यात पकडले. राहुरीतील अनिल गावडे या व्यापार्याने मोरेला आर्थिक मदत केल्याने त्याच्यावरही गुन्हेगारांना मदत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात सुरुवातीला काही राजकीय धुरिणांची नावेही चर्चिली गेल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मात्र, शेवटपर्यंत ती चर्चाच राहिली. आरोपींची नावे एका राजकीय पक्षाशी जोडली गेल्याने जिल्ह्यात विविध अफवांचे पिक आले होते. पण पोलिसांनी हत्याकाडांची उकल करीत सर्व आरोपींना गजाआड केले.
जमिनीच्या वादातून हत्या
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कान्हु मोरे याचे व पत्रकार दातीर यांचे गणेगाव येथील जमिनीवरुन वाद होते. त्यातून मोरे याने आपले साथीदार तौफीक शेख, अक्षय कुलथे व लाल्या उर्फ अर्जुन माळी यांना राहुरीत बोलावून तिघांनाही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले व दातीर यांचा खून केला. दातीर यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेले स्कॉर्पिओ वाहन मोरे याच्याच मालकीचे आहे. दरडगाव येथील वनविभागाच्या जागेत नेवून त्यांची हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर मृतदेह वाहनातून राहुरी शहरात आणला व महाविद्यालयाजवळ तो टाकून देत शहरात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची दहशत धुळीत मिळविली.
COMMENTS