मुंबई/प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी
मुंबई/प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. यावरून दहशतवादी समुद्रमार्गे भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचे तर्क लावले जात असतांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असून, भर समुद्रात ही बोट बंद पडल्यामुळे ती समुद्रकिनारी आली असल्याचे सांगितले.
फडणवीस म्हणाले, रायगडमधील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर किनार्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकार्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. बोटीमध्ये 3 ए. के. रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला.
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन-तीन एके-47 सह 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्या आहेत. तर, भरडखोल येथील किनार्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहे. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, काही स्थानिकांना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदार आणि स्थानिक पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
बोट ऑस्ट्रेलियन महिलेची
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बोटीबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार बोटीचे नाव ’लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्टेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. मात्र, 26 जूनरोजी सकाळी 10 वाजता बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका कोरिअन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले.
COMMENTS