अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिका कामगार संघटनेने 13 जुलै रोजी केलेले काम बंद आंदोलन बेकायदेशीर असल्याने या दिवसाचा कामगार-कर्मचार्यांचा पगार कापण्याचा
अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिका कामगार संघटनेने 13 जुलै रोजी केलेले काम बंद आंदोलन बेकायदेशीर असल्याने या दिवसाचा कामगार-कर्मचार्यांचा पगार कापण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. कामगार-कर्मचार्यांनी अचानक पुकारलेल्या काम बंदमुळे मनपाचे कामकाज ठप्प झाल्याची नाराजी स्थायी समितीनेही व्यक्त केली होती.
याबाबतची माहिती अशी की, मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकावर बाबा बंगाली चौक परिसरात झालेल्या दगडफेकीचे पडसाद मनपाच्या स्थायी समितीत उमटले. शुक्रवारी दुपारी झालेल्या सभेत या विषयावर वादळी चर्चा झाली. कामगार युनियनकडून अचानकपणे 13 जुलै रोजी विनाकारण काम बंद आंदोलन करण्यात आले, असा दावा करीत कर्मचार्यांचा त्या दिवशीचा पगार थांबविण्याचे आदेश दिले असल्याचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. स्थायी समिती सदस्यांनीही या कारवाईचे स्वागत केले. मंगळवारी (दि.12 जुलै) बाबा बंगाली परिसरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले गाळे पाडण्याची कारवाई सुरू असताना अतिक्रमण विरोधी पथकावर जोरदार दगडफेक करण्यात आली होती. यात कर्मचारी दत्तात्रय केशव जाधव हे जखमी झाले. या प्रकरणी प्रभाग अधिकार्याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तसेच अतिक्रमण विरोधी पथकास पोलिस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी कामगार युनियनने बुधवारी (दि. 13) काम बंद पुकारले होते. यात मुख्यालयासह चारही प्रभाग कार्यालयातील कर्मचार्यांनी सहभाग घेत शंभर टक्के बंद पाळला होता. या सर्व बाबींवर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. पोलिस बंदोबस्त न घेता अतिक्रमणावर कारवाई का केली? असा सवाल मुदस्सर शेख यांनी केला. घडलेल्या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न करीत विनीत पाऊलबुद्धे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. उपायुक्त डांगे म्हणाले की, बंदोबस्त न घेता कारवाई करणे चुकीचे आहे. मात्र, पोलिस ठाण्यात कामगार युनियनशी चर्चा केली होती. त्यानंतरही अचानकपणे काम बंद आंदोलन करण्यात आले. हे पण पूर्णपणे चुकीचे आहे. नागरिकांना वेठीस धरण्याची गरज नव्हती. यातून साध्य काय झाले? उलट, अधिक बंदोबस्त घेऊन त्याच भागात मोठी कारवाई करणे आवश्यक होते. विनाकारण काम बंद आंदोलन केल्याप्रकरणी त्या दिवसाचा कर्मचार्यांचा पगार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बंदोबस्त न घेता कारवाई का केली, या संदर्भात संबंधितांकडून खुलासा मागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
COMMENTS