अहमदनगर : सारडा महाविद्यालयाचे क्रीडा क्षेत्रातिल नावलौकिक पूर्वीपासूनच ऐकून होते. महाविद्यालयीन खेळाडूंची संख्या वाढण्यासाठी सारडा महाविद्यालया
अहमदनगर :
सारडा महाविद्यालयाचे क्रीडा क्षेत्रातिल नावलौकिक पूर्वीपासूनच ऐकून होते. महाविद्यालयीन खेळाडूंची संख्या वाढण्यासाठी सारडा महाविद्यालया सारखे काम इतर महाविद्यालयांनी करावे. क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धा घेण्यासाठी या महाविद्यालयात भरपूर क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. येथे नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण आहे. राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंना शासन थेट क्लास वन अधिकारी म्हणून नियुक्ती करत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथील खेळाडूंनी भरपूर मेहनत करावी. खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे असणाऱ्या या महाविद्यालयास खेळाडू व जिल्हा क्रीडाधिकारी या नात्याने पूर्ण सहकार्य करणार आहे अशी ग्वाही देते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत पदक व चषक मिळवलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा खास ‘ब्लेझर’ व पाच हजार रुपये देवून जिल्हा क्रीडाधिकारी व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या भाग्यश्री बिले व क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू शिल्पा शिंदे, संस्थेचे कार्याध्यक्ष अजित बोरा, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. अनंत फडणीस, संचालक अनंत देसाई, ज्योती कुलकर्णी, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.संजय धोपावकर, क्रीडा शिक्षक प्रा.संजय साठे आदींसह प्राध्यापक व सत्कारार्थी खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. सुधीर चपळगावकर म्हणाले, सारडा महाविद्यालयास असलेली वैभवशाली परंपरा येथील खेळाडू व शिक्षक पुढे नेत आहेत. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेमुळे दर्जेदार खेळाडू निर्माण होत आहेत. या स्पर्धेत ही महाविद्यालयातील खेळाडू चमकले आहेत. ब्रिजलाल सारडा म्हणाले, सारडा महाविद्यालयात स्व.दिनुभाऊ कुलकर्णी यांनी क्रीडा विभागाचे लावलेले रोपटे आता मोठा वटवृक्ष झाला आहे. दर्जेदार शिक्षणा सह खेळांसाठी येथे सर्व सुविधा उपलब्ध असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर उतुंग झेप घेत यशस्वी होत आहेत. अॅड. अनंत फडणीस म्हणाले, महाविद्यालयातील खेळाडूंना त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व इम्पोर्टेड क्रीडा साहित्य त्वरित उपलब्ध करून देत आहोत. सारडा महाविद्यालयात लवकरच मोठ्या स्वरूपात अत्याधुनिक स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुरु करत आहोत. यामाध्यमातून सर्वप्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाविद्यालयातील खेळाडून चमकदार कामगिरी करत असल्याने त्यांना प्रोत्साहन देणे संस्थेचे कर्त्यव्य आहे.
अजित बोरा म्हणाले, सारडा महाविद्यालयातील खेळाडूंनी मिळवलेले नेत्रदीपक यश अभिमानास्पद आहे. खेळाडूंनी महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. असे सांगून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रारंभी क्रीडा विभाग प्रमुख प्रा.संजय धोपावकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला त्यांनी सांगितले, हे वर्ष सारडा महाविद्यालयासाठी सोनेरी वर्ष ठरले आहे. तब्बल २१ खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. सायकलिंग, बास्केटबॉल, रायफल शुटींग, खो- खो, मल्लखांब, फुटबॉल, क्रिकेट, कार्फबॉल या खेळांमध्ये १५० ते २०० खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. खेलो इंडिया स्पर्धेत ही विद्यार्थी चमकले आहेत. महाविद्यालयातील खेळाडूंनी एवढ्या मोठ्यासंख्येने खूप मोठे यश मिळवले आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा शिक्षक प्रा.संजय साठे यांनी आभार मानले, प्रा.अरविंद झरेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपप्राचार्या डॉ.मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, प्रा.डॉ.स्मिता भुसे, साईनाथ थोरात, सेवक प्रतिनिधी गिरीष पाखरे आदी उपस्थित होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रणिती सोमण, सुयोग वाघ, संकल्प थोरात, दिशान गांधी आदी प्रमुख खेळाडूंसह तब्बल ६१ खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.
COMMENTS