नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा

वादावादीमुळे घेतला निर्णय, बँकेच्या अडचणीत भर

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा व बँकेच्या संचालकपदाचाही तडकाफडकी

विशेष मोक्का न्यायालयाने केली दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल..|सुपरफास्ट २४ | LokNews24|
राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी ; ३९९.३३ कोटींचा निधी मंजूर : आ. रोहित पवार

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा व बँकेच्या संचालकपदाचाही तडकाफडकी राजीनामा दिला. बँकेतील सत्ताबाह्य केंद्राशी झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकल्याचे बोलले जात आहे. अनेकविध अडचणींचा सामना करताना अस्तित्वही धोक्यात आलेल्या नगर अर्बन बँकेच्यादृष्टीने अध्यक्ष अग्रवाल यांचा राजीनामा धक्कादायक मानला जात आहे. सोशल मिडियातून यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्य संगीता गांधी यांनी याआधीच संचालकपदाचा राजीनामा दिला आहे व आता अग्रवाल यांनीही संचालकपद सोडल्याने बँकेच्या संचालकांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता अग्रवाल जाहीरपणे बँकेच्या कारभाराबाबत काही बोलतात का, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

नगर अर्बन बँकेतील चुकीचे कर्ज वाटप व गैरव्यवहार यामुळे सहा गुन्हे दाखल आहेत. यापैकी काही गुन्ह्यांची न्यायालयीन सुनावणीही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मागच्या आठवड्यात बँकेचे कर्जतचे खातेदार बँकेसमोर उपोषणास बसले होते. रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने या खातेदारांना त्यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नसल्याने हे निर्बंध उठवावे अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनास बँकेचे संचालक गिरीश लाहोटी यांनी पाठिंबा देताना बँकेचे अध्यक्ष अग्रवाल यांच्यावर निष्क्रीयतेचा तसेच त्यांच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला होता. संचालक मंडळाची बैठकच ते घेत नाहीत, थकबाकी वसुलीही करीत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे होते. त्याला अध्यक्ष अग्रवाल यांनी लगेच उत्तर दिले होते व मागील सात महिन्यात 120 कोटींची वसुली केल्याचे सांगताना संचालक गिरीश लाहोटी यांचे वडील केदार लाहोटी यांनी कर्ज सेटलमेंटसाठी 1 कोटी घेतल्याचे व जालन्याच्या कर्जदाराकडून त्यांच्या खात्यात 1 कोटी आल्याचा दावा केला होता. गिरीश लाहोटींनी त्याला आक्षेप घेताना, या आरोपांचे पुरावे देण्याचे नाही तर अध्यक्षपद सोडण्याचे आव्हान त्यांना दिले होते. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी बँकेमध्ये अग्रवाल यांच्यासह माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यात या विषयावरून जोरदार खडाजंगी झाली व त्याचवेळी अग्रवाल यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा व संचालक पदाचा राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकल्याचे सांगितले जाते. अग्रवाल यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, सुवेंद्र गांधी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी अग्रवाल यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

नगर अर्बन बँकेवर मागील नोव्हेंबर 2021मध्ये नवे संचालक मंडळ सत्तारुढ झाले आहे. अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची व दीप्ती गांधी यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे 1 डिसेंबर 2021 रोजी हाती घेतल्यावर अवघ्या चार-पाच दिवसातच रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेच्या कामकाजावर निर्बंध लावले. बँकेची थकबाकी 450 कोटीवर गेल्याने ती आधी वसूल करण्याचे व तोपर्यंत नवे तसेच नवे-जुने कर्ज वितरण बंद केले आहे. खातेदारांनाही सहा महिन्यातून एकदा 10 हजार रुपये मिळण्याची मुभा आहे. सहा महिन्यांसाठीचे हे निर्बंध आणखी तीन महिने वाढवले गेले आहेत. या निर्बंधांची मुदत अजून दोन महिने बाकी आहे. या सात महिन्यांच्या काळात बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या पाठपुराव्याने डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे 5 लाखाआतील ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये परत मिळाले आहेत. मात्र, 5 लाखापुढील ठेवीदारांचे पैसे मिळणार की नाही, याचा संभ्रम आहे. तर दुसरीकडे बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांनी दगडखाणी व शेत जमिनीवर नगर अर्बन बँकेने नियमबाह्य कर्ज दिले असल्याने या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून वसुली करण्याचे आवाहन केले होते. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष अग्रवाल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आधीच अडचणीत असलेली ही बँक आणखी अडचणीत आल्याचे मानले जात आहे.

COMMENTS